Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेची मुख्य नायिका जुई गडकरीने नुकताच सोशल मीडियावर तिच्या सहकलाकारांबरोबर एक सेल्फी फोटो शेअर केला होता. जुईसह प्रियांका तेंडोलकर ( प्रिया ) आणि प्राजक्ता दिघे ( कल्पना ) या अभिनेत्री एका ट्रिपला निघाल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळालं होतं. याशिवाय जुईने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत, “लवकरच आम्ही मुली फिरायला जाणार आहोत” असं सांगितलं होतं.
जुईने फोटो शेअर करत ट्रिपला जात असल्याची हिंट सर्वांना दिली होती. मात्र, आता या तिघीजणी नेमक्या कुठे जात आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले होते. अखेर जुईने सविस्तर पोस्ट शेअर करत या ट्रिपबद्दलची माहिती चाहत्यांना दिली आहे. जुई, प्रियांका आणि प्राजक्ता या तिघीजणी शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पोहोचल्या होत्या.
जुई म्हणते, “३ वर्षांपासून या ट्रिपचं प्लॅनिंग करत होतो. पण, त्यांनी बोलावल्याशिवाय जाणं होतच नाही हे अगदी खरं आहे. ४५ मिनिटांचे रोजचे एपिसोड्स, ४५ डिग्री तापमान, बुकिंग मिळेल की नाही काहीच माहीत नव्हतं. पण, शेवटी या सगळ्याच गोष्टी व्यवस्थित ॲडजस्ट झाल्या आणि शेगावला श्री गजानन महाराजांचं सुंदर दर्शन झालं! प्रवास सुखरुप झाला.. सगळंच छान होतं मुळात मन शांत झालं.”
“तीन लहान मुली ट्रिपला गेल्यासारखं वाटलं! गाडीत सीट बदलून घेतल्या, मग खाऊ खाल्ला, UNO खेळलो (मी मातीच खात होते ), शेगाव कचोरी खाल्ली.. स्टेशनवर गाडीची वाट बघत पुन्हा UNO खेळलो. मित्राच्या आईने करुन दिलेल्या जेवणावर ताव मारला, झोपा काढल्या, सुर्यास्तानंतरही उष्ण वाहणारा वारा अनुभवला… स्टेशनवर पहिल्यादांच बॅटरी बग्गी मध्ये बसलो! ( एकदम विमानतळावरच असल्यासारखं वाटलं ) एकूण काय तर देवाच्या कृपेने सगळंच छान झालं. प्रियांका खरंच खूप खूप थँक्यू. हा प्रवास आपल्या सगळ्यांच्या कायम लक्षात राहील.” असं जुईने सांगितलं.
दरम्यान, जुईने शेअर केलेल्या या पोस्टवर मालिकेतील अस्मिता म्हणजेच मोनिका दबाडे कमेंट करत म्हणते, “मी मिस केलं…वृंदा मोठी होऊदेत…मस्त प्लॅन करुयात आपण” यावर जुईने ‘नक्की’ असा रिप्लाय दिला आहे. याशिवाय केतकी पालव, श्रद्धा वर्तक, शिल्पा नवलकर, सागर तळाशीकर यांनी पोस्ट खास कमेंट्स करत या तिघींचं कौतुक केलं आहे.
