Tharala Tar Mag Fame Nagraj Real Life Lovestory : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळेच कलाकार आता घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. यामध्ये नागराज ही खलनायकाची भूमिका अभिनेते ज्ञानेश वाडेकर साकारत आहे. नकारात्मक भूमिका असूनही त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ज्ञानेश वाडेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि लव्हस्टोरीबद्दल खुलासा केला आहे.

ज्ञानेश वाडेकर यांच्या पत्नीचं नाव आहे जानकी. या दोघांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली होती. आर्किटेक्चरचं शिक्षण घेत असताना एका सबमिशन दरम्यान ज्ञानेश व जानकी यांची ओळख झाली आणि पुढे हळुहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २००५ मध्ये ज्ञानेश आणि जानकी या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या फिल्मी लव्हस्टोरीबद्दल अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

ज्ञानेश वाडेकर ‘महाराष्ट्र टाइम्स’शी संवाद साधताना सांगतात, “एक वय असतं जेव्हा लोक पाहताच क्षणी एखाद्याच्या प्रेमात पडतात… तसं माझ्या बाबतीत काहीच झालं नाही. एका क्षणानंतर मला दडपण आलं होतं…अरे माझ्या आयुष्यात मैत्रीणच नाहीये. आता आयुष्यात एक तरी मैत्रीण पाहिजे…असा विचार करत मग हिला बघ, तिला बघ…ही नको… ती नको, कोणाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मग अचानक आयुष्यात तिची एन्ट्री झाली. एके दिवशी कॉलेजमध्ये सबमिशन सुरू होतं…तिथे ती आली होती. एकदम फिल्मी स्टोरी आहे.”

“तिचा रुमाल पडला…एका मित्राने मला तिचा रुमाल दाखवला, तो मी तिला दिला. तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यात काहीच असं सुरू नव्हतं. पण, नंतर ती स्वत:हून माझ्याशी बोलायला आली आणि तेव्हा ती फसली. त्याच्यानंतर मी ठरवलं…हीच आपल्यासाठी योग्य आहे, चांगली आहे. त्यानंतर मी तिला पत्र पाठवलं होतं.”

“१९९६ मी तिला पत्र लिहिलं होतं. ते पत्र तिच्यापर्यंत पोहोचलं…अर्थात सुरुवातीला फक्त मैत्री होती. वर्षभर आमची छान मैत्री होती…त्यानंतर प्रेमाचे अंकुर फुटले. मग काही वर्षांनी लग्न झालं. पण, ती सुरुवात पत्रापासून आणि रुमालापासून झाली होती.” असं ज्ञानेश वाडेकर यांनी सांगितलं.

दरम्यान, ठरलं तर मग मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर गेली साडेतीन वर्षे ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ज्ञानेश वाडेकर यामध्ये रविराज किल्लेदारांचा धाकटा भाऊ नागराजची भूमिका साकारत आहे. नागराजने प्रॉपर्टी मिळवण्यासाठी काही वर्षांपूर्वी भावाच्या कुटुंबाला अपघातात संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो. काही दिवसांपूर्वीच हे सत्य सर्वांसमोर उघड झालं आणि सध्या नागराज तुरुंगात असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे.