‘ठरलं तर मग’ मालिकेने गेल्या तीन वर्षात प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि यामुळेच ही मालिका टीआरपीमध्ये सुद्धा आघाडीवर आहे. गेल्या काही वर्षांत ‘ठरलं तर मग’ने टीआरपीचे असंख्य रेकॉर्ड्स मोडले आहेत. पण, तुम्हाला माहितीये का? या मालिकेत अशी एक अभिनेत्री आहे, जिने काही वर्षांपूर्वी टेलिव्हिजनवर सुपरहिट ठरलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. या अभिनेत्रीने स्वत: हा किस्सा शेअर केला होता.

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या प्रमुख कलाकारांसह यामधील खलनायिका प्रियाची सुद्धा सर्वत्र क्रेझ निर्माण झाली आहे. प्रियाचं हे निगेटिव्ह पात्र लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर साकारत आहे. २०१५ मध्ये प्रसारित झालेल्या आणि सर्वत्र तुफान गाजलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेसाठी प्रियाने ऑडिशन दिली होती.

प्रियांका तेंडोलकरला ‘स्टार मीडिया मराठी’शी संवाद साधताना तिच्या पहिल्या ऑडिशनबद्दल विचारण्यात आलं. यावेळी अभिनेत्री म्हणाली, “माझ्या पहिल्या ऑडिशनमुळे मला काम मिळालं नव्हतं. पण, त्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मी आजवर खूप ऑडिशन दिल्या आहेत. पण, पहिल्या ऑडिशनमध्ये ब्रेक मिळाला असं वगैरे काही नाही. मी सगळ्यात पहिली ऑडिशन विनोद लव्हेकर सरांकडे दिली होती. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ नावाचा ‘झी मराठी’वर प्रोजेक्ट आला होता, त्यासाठी मी ऑडिशन दिली होती.”

Award Banner

“लव्हेकर सरांनी खूप छान ऑडिशन घेतली होती. मला अजूनही आठवतंय, त्यांनी इम्प्रोवाइज करून घेतलं होतं. तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. तेव्हा मी आतापेक्षा अभिनयाबाबतीत थोडी कमी होते. पण, हळुहळू प्रत्येक भूमिकेमुळे मी घडत गेले आणि आता मी जे काम करतेय त्या सगळ्याचं श्रेय माझ्या आधीच्या या सगळ्या ऑडिशनचं आहे.” असं प्रियांका तेंडोलकरने सांगितलं.

दरम्यान, प्रियांकाने यापूर्वी ‘फुलपाखरू’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’, ‘साथ दे तू मला’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

याशिवाय ‘ठरलं तर मग’बद्दल सांगायचं झालं, तर सध्या या मालिकेत धमाकेदार ट्रॅक सुरू आहे. प्रिया खरी तन्वी नाहीये हे सत्य लवकरच अर्जुन-सायलीसमोर उघड होणार आहे. आता प्रियाचं हे सत्य सुभेदारांना समजल्यावर मालिकेत काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.