Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी प्रमुख भूमिका साकारतेय. ती साकारत असलेल्या सायलीच्या भूमिकेने गेली साडेतीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सायली-अर्जुन या ऑनस्क्रीन जोडीचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात आहे. सायलीला नुकत्याच एका मुलाखतीत काही रॅपिड फायर प्रश्न विचारले गेले. या सगळ्या प्रश्नांची जुईने हटके अन् मजेशीर उत्तरं दिली आहेत.

‘ठरलं तर मग’ मालिकेचा अनेकदा महासंगम होतो. टीआरपीच्या कारणास्तव दोन किंवा तीन मालिकांचा एकत्र मिळून महासंगम केला जातो. या महासंगम विशेष भागांचं शूटिंग भरपूर वेळ चालतं. आजवरचे ‘ठरलं तर मग’चे अन्य मालिकांबरोबरचे सगळेच महासंगम यशस्वी ठरले आहेत. प्रियाला शिक्षा घडवण्यासाठी जुईच्या मदतीला ‘ठरलं तर मग’ मालिकेत स्टार प्रवाहच्या अन्य १२-१३ नायिका आल्याचं काही दिवसांपूर्वीच्या भागात पाहायला मिळालं. या सगळ्याच एपिसोडला खूप छान टीआरपी देखील मिळतोय.

त्यामुळे कॉकेटल स्टुडिओच्या रॅपिड फायर मुलाखतीत जुईला विचारण्यात आलं की, “मालिकांमध्ये महासंगम सतत होत असतात, त्याबद्दल तुला चॅनेलला एखादा सल्ला द्यायचा असेल, तर तो सल्ला एका वाक्यात काय असेल?”

याच उत्तर जुईने अतिशय मजेशीररित्या दिलं आहे. “मी महासंगम करायला नेहमीच तयार आहे, फक्त दरवर्षी महामालिका आम्हालाच द्या.” म्हणजेच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात महामालिकेचा पुरस्कार आम्हालाच द्या असं जुईने मजेशीररित्या सुचित केलं.

याशिवाय, “सेटवर सर्वात जास्त गॉसिप्स तू कोणाबरोबर शेअर करतेस?” या प्रश्नावर अभिनेत्रीने, प्राजक्ता कुलकर्णी ( कल्पना ) आणि प्रियांका तेंडोलकर ( प्रिया ) या दोघींची नावं घेतली. तसेच आम्ही तिघी एक रूम शेअर करत असल्याने, आमच्यात जास्त गॉसिप्स होतात असंही जुई म्हणाली.

अभिनेत्री नसतीस तर कोणत्या प्रोफेशनमध्ये असतीस? या प्रश्नावर जुईने Advertising असं उत्तर दिलं आहे.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर सध्या यामध्ये सायलीला तिच्या भूतकाळाचे भास होत आहेत. त्यामुळे स्वत:ची खरी ओळख जाणून घेण्यासाठी ती मधुभाऊंकडे पोहोचते. पण, नागराजने मधुभाऊंवर केलेल्या हल्ल्यामुळे ते कोमात आहेत. आता मधुभाऊ कोमातून बाहेर केव्हा येणार? आणि सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य सुभेदारांसमोर केव्हा उघड होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.