Marathi Actors supports Shashank Ketkar: शशांक केतकर हा अनेक मालिकांतील भूमिकांमुळे लोकप्रिय ठरला आहे. त्यामध्ये होणार सून मी या घरची, सुखाच्या सरींनी मन हे बावरे, पाहिले न मी तुला अशा अनेक मालिकांमधून त्याला प्रसिद्धी मिळाली. सध्या शशांक मुरांबा या मालिकेत अक्षय ही भूमिका साकारत आहे.

शशांकने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत मालिका संपून पाच वर्षे झाली तरी मंदार देवस्थळींनी पाच लाख रुपये दिले नाहीत. पैशांचा विषय स्वत: कधीही काढत नाहीत. आम्ही हा विषय काढला की तो रडतो, गयावया करतो. डार्लिंग, बाळा वगैरे म्हणतो. तो सतत थापा मारतो आणि मुलाखती पाहिल्या, तर त्याचा हा पॅटर्न आहे. मी आता कायदेशीर कारवाई करणार आहे, असे म्हणत शशांकने पोस्ट शेअर केली होती. त्याबरोबरच एक व्हिडीओ शेअर करीत त्याने भावना व्यक्त केल्या.

शशांक केतकरला मराठी कलाकारांचा पाठिंबा

आता शशांकच्या या पोस्टवर चाहते, तसेच अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला आहे. तसेच, काही कलाकारांनी त्यांच्याबरोबरही तसाच प्रकार घडल्याचे सांगितले आहे.

‘ठरलं तर मग’फेम अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी कमेंट करीत शशांकला पाठिंबा दिला. त्यांनी लिहिले, “मी तुझ्याबरोबर आहे. तू उत्तम करत आहेस.”

‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये काम करीत असलेल्या अभिनेत्री विदिशा म्हसकरने कमेंट करत आपबिती सांगितली. तर अभिनेता पार्थ घाडगेनेदेखील मी अशाच परिस्थितीतून जात असल्याचे सांगितले आहे. त्याबरोबरच संग्राम समेळने कमेंट करीत साडेतीन लाख बाकी आहेत. टीडीएसबद्दल तर बोलायलाच नको. पाच वर्षांपूर्वी पोस्ट केली होती, तेव्हा दादाला पाठिंबा देणारे लोक अचानक उभे राहिले. ४००-५०० लोक होते. तसेच, अंकिता वालावलकरने तिचा पती कुणाल भगतला टॅग करीत लिहिले, “तुझे पैसे कोणी बुडवलेत, त्यांची नावं मी इथे लिहू का?”

शशांकने सगळ्यांनी बोललं पाहिजे, असे लिहीत सर्वांच्या कमेंट्सला उत्तर दिले आहे. कलाकारांबरोबरच चाहतेही शशांकला पाठिंबा देत आहेत. कष्टाचे पैसे आहेत. तू बरोबर बोललास अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे. नेटकरी काय म्हणाले हे जाणून घेऊ…

एकाने लिहिले, “केलेल्या कामाचे हक्काचे पैसे आहेत. त्यात ट्रोलर्सचा विचार काय करायचा ? लढा. लवकर पैसे मिळतील ही आशा आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले, “शशांक तुझं अगदी बरोबर आहे. कारण कामाचे पैसे तर मिळालेच पाहिजेत ना? आणि आपल्या मेहनतीच्या पैशासाठी आपण भीक मागायची हे अत्यंत चुकीचं आहे. लहान रक्कम असेल तर आपण सोडून देऊ शकतो पण एवढी मोठी रक्कम सोडू शकत नाही. म्हणून शशांक तू जे काही करतोस ते योग्यच आहे.” एकाने लिहिले, “या गोष्टी उघड पणे बोलता आल्या पाहिजे. माझ्या सारख्या क्रिएटर बाबतीत देखील असे अनुभव आले आहेत. “

दरम्यान, आता शशांक आणि इतर कलाकारांच्या पैशांबाबत मंदार देवस्थळी काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.