Tharala Tar Mag Fame Jui Gadkari : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा कायम नंबर वन असते. आता या मालिकेतील सगळे कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. सायली, अर्जुन, प्रिया, पूर्णा आजी, कल्पना ही सगळी पात्रं प्रेक्षकांना आपलीशी वाटतात.
या मालिकेत सायलीची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ही पोस्ट ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या चाहत्यांसंदर्भात आहे. गेल्या तीन वर्षांत सोशल मीडियावर या मालिकेचे अनेक फॅन्स सक्रिय आहेत. यांच्यापैकीच काही चाहते नुकतेच ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर पोहोचले होते. यावेळी या चाहत्यांनी जुईसह अन्य कलाकारांसाठी काही भेटवस्तू नेल्या होत्या.
यापूर्वी सुद्धा या सगळ्या चाहत्यांनी ‘ठरलं तर मग’मधील कलाकारांना अशाचप्रकारे गोड भेटवस्तू दिल्या आहेत. त्यामुळे जुईने सर्वप्रथम त्यांचे आभार मानले. अभिनेत्री म्हणाली, “तुम्ही आम्हा सगळ्या कलाकारांसाठी आवडीने या गोष्टी करता…खरंच थँक्यू! ही खूप मोठी गोष्ट आहे.”
जुईला या चाहत्यांनी ‘क्वीन ऑफ Hearts’ हा पुरस्कार यावेळी दिला. यावर “जुई गडकरी, लाडकी सायली” असं लिहिण्यात आलं आहे. याशिवाय Evil Eye, लक्ष्मी यंत्र पिरामिड, शिवलिंग, खास फोटो फ्रेम अशा बऱ्याच वस्तू जुईच्या चाहत्यांनी तिला भेट म्हणून दिल्या आहेत. फोटो फ्रेममध्ये जुईचे तिच्या आजीबरोबरचे आठवणीतले खास फोटो आहेत.
गेल्यावर्षी सुद्धा ‘ठरलं तर मग’च्या या चाहत्यांनी सेटवरच्या प्रत्येक कलाकाराला पुरस्काररुपी भेट दिली होती.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये आता लवकरच अर्जुन-सायलीसमोर खरी तन्वी प्रिया नाहीये. तिची ओळख बबली लोखंडे आहे हा खुलासा होणार आहे. आपलं भांडं फुटू नये यासाठी प्रिया गेल्या काही दिवसांपासून साक्षीदारांना पैसे देताना दिसते. तर, दुसरीकडे अस्मिता आता सचिनमुळे सायलीच्या विरोधात जाणार आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार? प्रियाचं सत्य सुभेदारांना समजेल का? आणि अस्मिताला सचिनचं खरं रूप केव्हा कळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चाहत्यांना आगामी भागात मिळतील.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या सोमवार ते शुक्रवार रात्री ८:४५ ते ९.३० आणि शनिवार-रविवार नेहमीच्या वेळेत रात्री ८:३० वाजता प्रसारित केली जाते.
