Tharala Tar Mag Fame Actress : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. रंजक कथानक, उत्तम स्टारकास्ट, मालिकेत सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका कायम आघाडीवर असते. यामध्ये अभिनेत्री जुई गडकरीने सायली, तर अभिनेता अमित भानुशाली अर्जुन हे पात्र साकारतोय. पण, या मुख्य जोडीच्या बरोबरीने ‘ठरलं तर मग’मधील आणखी एक अभिनेत्री कायम चर्चेत असते ती म्हणजे प्रिया. अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर या मालिकेत प्रिया ही खलनायिकेची भूमिका साकारतेय.
अर्जुन-सायलीचा खरा स्वभाव आणि सतत काही ना काही कुरघोड्या करून त्यांना त्रास देणारी प्रिया हे समीकरण आपल्याला कायमच मालिकेत पाहायला मिळतं. सायली-प्रिया तर कायम एकमेकींच्या विरोधात असतात. पण, पडद्यावर या पात्रांमध्ये कितीही भांडणं असली तरी ऑफस्क्रीन मात्र, सायली-प्रियाची मैत्री तेवढीच घट्ट आहे. मालिकेत या दोघी कितीही भांडल्या तरी, खऱ्या आयुष्यात कायम एकत्र असतात. ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर सुद्धा सायली अन् प्रियाने एकत्र एन्ट्री घेतली होती.
सायली-प्रियाचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग पाहून सगळेच थक्क झाले होते. यावेळी सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुईने प्रियांका सेटवर सगळ्यात लहान असल्याचं सांगितलं. यावेळी जुई गडकरीने त्या दोघींच्या वयात नेमकं किती वर्षांचं अंतर आहे, याबद्दल खुलासा केला आहे.
जुई गडकरी ( सायली ) आणि प्रियांका तेंडोलकर ( प्रिया ) या दोघींमध्ये ७ वर्षांचं अंतर आहे. जुईला आता येत्या जुलैमध्ये ३८ वर्षे पूर्ण होतील. तर प्रियांका ३१ वर्षांची आहे. सेटवर काम करणाऱ्या कलाकारांमध्ये प्रियांकाच सर्वात लहान असल्याचं जुईने लोकमत फिल्मीशी संवाद साधताना सांगितलं.
प्रियांका वयाने लहान असली तरीही प्रचंड समजूतदार मुलगी आहे असंही यावेळी जुईने सांगितलं. तर, जुईसारखी सगळ्या गुणांनी परिपूर्ण अशी मैत्रीण प्रत्येकाच्या आयुष्यात असावी असं मत प्रियांकाने व्यक्त केलं.
सायली-प्रिया पडद्यावर कितीही भांडत असल्या तरीही त्यांची ऑफस्क्रीन मैत्री खूपच छान आहे. त्यामुळे सर्वत्र या दोघींचं कौतुक करण्यात येतं. दरम्यान, आता मालिकेत लवकरच प्रिया ही खरी तन्वी नसून तिची सदाशिव-मैनाची मुलगी बबली लोखंडे आहे याचा उलगडा अर्जुन-सायलीसमोर होणार आहे.
