Tharala Tar Mag Fame Jui Gadkari : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या शोमधील सगळेच कलाकार आता घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. अभिनेत्री जुई गडकरी या मालिकेत सायली ही मुख्य भूमिका साकारत आहे. मालिकांचं शूटिंग दररोज जवळपास १२ तास सुरू असतं. याशिवाय सध्याच्या काळात मालिका आठवड्याचे सातही दिवस टेलिकास्ट केल्या जातात. त्यामुळे दैनंदिन मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं शेड्युल खूपच व्यग्र असतं.

जुईसह ‘ठरलं तर मग’ मालिकेची संपूर्ण टीम शूटिंगसाठी खूप मेहनत घेत असते. अनेकदा अभिनेत्री लेट नाइट पॅकअपचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करते. आता प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री तिच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत एका खास जागी फिरायला गेली आहे.

जुई सध्या परदेशवारी करताना दिसतेय. याचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. तिने एअरपोर्टवरचे फोटो शेअर करत बाहेरगावी जात असल्याची कल्पना आधीच चाहत्यांना दिली होती. पण, जुई नेमकी कुठे जातेय हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुक होते.

जुई गडकरी ‘हाँगकाँग डिस्ने लँड’ येथे फिरायला गेली आहे. या सुंदर जागेचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तेथे तापमान कमी असल्याने प्रचंड थंडी आहे त्यामुळे कानटोपी घातलेला फोटो शेअर करत जुईने त्याला ‘Freezing’ असं कॅप्शन दिलं आहे. दुसरा एक सेल्फी फोटो शेअर करत अभिनेत्री लिहिते, “माझ्या वजनाएवढी शॉपिंग बॅग भरलीये. जेव्हा तुमचं वजन आणि शॉपिंग बॅगचं वजन सारखंच होतं…” याचा अर्थ हाँगकाँग डिस्ने लँड फिरून अभिनेत्रीने भरपूर शॉपिंग केल्याचं स्पष्ट झालं आहे. येथील Fireworks शो पाहण्यासाठीही चाहते प्रचंड गर्दी करतात. जुईने या शोची झलकही सर्वांना दाखवली आहे.

jui gadkari
अभिनेत्री जुई गडकरी हाँगकाँगला पोहोचली

अभिनेत्रीने शेअर केलेल्या आणखी एका फोटोमध्ये क्युट अशा मिकी माऊसची झलक पाहायला मिळतेय. जुईने शेअर केलेल्या या सगळ्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

jui

अभिनेत्री जुई गडकरी हाँगकाँगला पोहोचली

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, या सिरियलचा पहिला भाग ५ डिसेंबर २०२२ रोजी प्रसारित झाला होता. गेली ३ वर्षे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर आहे. याशिवाय सलग दोन वर्षे ‘ठरलं तर मग’ सिरियल ‘महाराष्ट्राची महामालिका’ ठरली आहे.