Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेली साडेतीन वर्षे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका दररोज ४५ मिनिटं प्रसारित केली जात आहे. आता दररोज ४५ मिनिटांचा एपिसोड शूट करायचा म्हटल्यावर संपूर्ण टीमला प्रचंड मेहनत घ्यावी लागतेय. कलाकारांसह तंत्रज्ञ दिवसरात्र काम करत आहेत. याबद्दल मालिकेची मुख्य नायिका सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने स्वत: खुलासा केला आहे.

जुई गडकरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनेकदा ‘आस्क मी सेशन’ घेते, आणि चाहत्यांनी विचालेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं देते. नेटकरी तिला मालिका आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अनेक प्रश्न विचारतात. नुकत्याच घेतलेल्या ‘आस्क मी सेशन’मध्ये जुईला एका नेटकऱ्याने मालिकेची टीम किती तास काम करते असा प्रश्न विचारला यावर अभिनेत्रीने काय उत्तर दिलंय पाहुयात…

“तुमची सगळी टीम दररोज किती तास काम करते? आणि तुम्हाला सुट्टी कधी असते?” जुई यावर उत्तर देत म्हणते, “दररोज १३ तास! कधी १४ ते १५ तासांची शिफ्ट…तर कधी-कधी २४ तासही काम करावं लागतं. डे-नाइट शिफ्ट असते…आणि सुट्टीचं सांगायचं झालं तर, सुट्टी??? ती काय असते? कारण, सध्या आम्ही दररोज ४५ मिनिटांचे एपिसोड शूट करतोय. #45Min Episode Everyday”

jui ask me session Tharala Tar Mag Fame Actress
जुई गडकरीने नेटकऱ्याला दिलं उत्तर ( Tharala Tar Mag Fame Actress )

यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत जुई ४५ मिनिटांच्या एपिसोडबद्दल म्हणाली होती, “सध्या ४५ मिनिटांचा एपिसोड तुम्ही सगळे पाहाताय…यासाठी खूप मेहनत असते. या सगळ्यात इव्हेंट वगैरे हे सगळं जुळवून घेणं ही आमच्यासाठी तारेवरची कसरत आहे. शूटिंगदरम्यान प्रकृतीची फार काळजी घ्यावी लागते. पण, प्रत्येकवेळी हे शक्य होत नाही. तुम्हाला समजा एखादा सीन आवडला नाही तर ट्रोल करणं फार सोपं आहे. पण, ४५ मिनिटांचा दररोजचा एपिसोड शूट करणं…ही गोष्ट फार कठीण आहे. हे अजिबात सोपं नाहीये.”

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या सोमवार ते शुक्रवार रात्री ८:४५ ते ९:३० या वेळेत प्रसारित केली जाते. तर शनिवार-रविवार या मालिकेची वेळ नेहमीप्रमाणे साडेआठची असते.