Tharala Tar Mag Fame Jui Gadkari : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली साडे तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नुकताच या मालिकेने ११०० भागांचा टप्पा ओलांडला. अलीकडच्या काळात एखाद्या मालिकेने हजार एपिसोड्स पूर्ण करणं ही मोठी गोष्ट आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या संपूर्ण टीमचं हे श्रेय आहे. ‘स्टार प्रवाह’ची ही टीआरपी टॉपर मालिका गेल्या काही दिवसांपासून ४५ मिनिटं ऑन एअर होतेय. दररोज ४५ मिनिटांचा भाग शूट करण्यासाठी कलाकारांसह पडद्यामागे काम करणाऱ्या तंत्रज्ञांना सुद्धा तेवढीच मेहनत घ्यावी लागते. अनेकदा व्यग्र शेड्युलमुळे सुट्ट्या सुद्धा मिळत नाहीत. सलग १४ ते १५ तास शूट केल्यावर अनेकदा प्रकृतीकडे सुद्धा दुर्लक्ष होतं. या सगळ्यावर अभिनेत्री जुई गडकरीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी साकारत आहे. सध्याच्या व्यग्र शेड्युलविषयी जुई लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “शूटिंगदरम्यान प्रकृतीची फार काळजी घ्यावी लागते. पण, प्रत्येकवेळी हे शक्य होत नाही. आता प्रकृतीच्या दृष्टीकोनातून तुम्हाला ७-८ तास झोप मिळाली पाहिजे. तुम्हाला मानसिक थकवा येऊ नये या सगळ्याची काळजी घ्यावी लागते. पण, इतका वेळ सलग काम करताना प्रकृतीकडे लक्ष देता येत नाही. तुम्हाला समजा एखादा सीन आवडला नाही तर ट्रोल करणं फार सोपं आहे. पण, ४५ मिनिटांचा दररोजचा एपिसोड शूट करणं…ही गोष्ट फार कठीण आहे. हे अजिबात सोपं नाहीये.”

फेब्रुवारी महिन्यात आम्ही सुट्टीच घेतली नाही…

“आता दररोज ४५ मिनिटांच्या एपिसोडचं शूटिंग आम्ही का करतोय यामागे सुद्धा काही तांत्रिक गोष्टी आहेत. आता IPL सुरुये…अनेक गोष्टी आहेत. आता प्रत्येक गोष्ट आम्ही सांगू शकत नाहीत…यामागे बऱ्याच तांत्रिक गोष्टी आहेत. पण, प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं ही मोठी जबाबदारी प्रत्येकावर आहे. त्यामुळे आम्ही सातही दिवस सध्या ४५ मिनिटांचे मोठे एपिसोड शूट करतोय. जेणेकरून सर्वांना मालिकेचा आनंद घेता येईल. आता यादरम्यान अनेकदा प्रकृती वगैरे या सगळ्या गोष्टी मागे राहतात. तुम्ही मालिकांसाठी महिन्याचे एकूण ३० दिवस शूट करता. त्यात दररोज १४ तास शूटिंग असतं. अनेकदा सलग २४ तास शूटिंग सुरू असतं. फेब्रुवारीचा संपूर्ण महिना आम्ही कोणीच सुट्टी घेतली नव्हती. यामुळे आमचं युनिट सुद्धा अनेकदा दमतं.” असं जुईने सांगितलं.

“आमच्यासाठी तारेवरची कसरत…”

काही दिवसांपूर्वीच २०२६ चा ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला जुईने प्रियांका तेंडोलकरसह एन्ट्री घेतली होती. यावेळी सुद्धा अभिनेत्रीने मालिकेच्या शूटिंगबद्दल आपलं मत मांडलं होतं. जुई म्हणालेली, “प्रेक्षकांना जे बघायचं आहे ते ‘ठरलं तर मग’मध्ये नेहमीच दाखवण्यात आलेलं आहे. आता मालिका एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. साडेतीन वर्षातला हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. आम्ही सगळेजण यासाठी खूप मेहनत करतोय. सध्या ४५ मिनिटांचा एपिसोड तुम्ही सगळे पाहाताय…यासाठी खूप मेहनत असते. या सगळ्यात इव्हेंट वगैरे हे सगळं जुळवून घेणं ही आमच्यासाठी तारेवरची कसरत आहे. आता काम करताना खूप मजा येतेय कारण, मालिकेत एक मोठं सत्य बाहेर येतंय. त्यात सायली प्रियाला खूप त्रास देणार आहे.”

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत जुई गडकरीसह अमित भानुशाली, प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, मोनिका दबाडे, शिल्पा नवलकर अशा अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.