Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली सध्या तन्वीच्या भूतकाळाचा शोध घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. खरंतर, सायली हीच खरी तन्वी असते पण, तिची मूळ ओळख अद्याप तिला समजलेली नाहीये. बालपणी झालेल्या भीषण अपघातामुळे तन्वीची स्मृती जाते, पुढे मधुभाऊ तिचा आश्रमात सांभाळ करतात. इथेच तन्वीला सायली म्हणून ओळख मिळते. आता प्रियाचं खरं नाव बबली लोखंडे आहे हे सिद्ध झालंय, त्यामुळे खरी तन्वी कोण असा प्रश्न सगळ्या सुभेदारांसमोर निर्माण झाला आहे.

सायलीची खरी ओळख आताच्या क्षणाला प्रिया, नागराज, महिपत, साक्षी या खलनायकांशिवाय फक्त मधुभाऊंना माहीत असते. पण, नागराजने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यावर मधुभाऊ कोमात जातात. सायलीच खरी तन्वी आहे आणि रविराज व प्रतिमा किल्लेदार तिचे आई-बाबा आहेत हे सत्य मधुभाऊंना तिचा बालपणीचा फोटो पाहिल्यावर समजतं. पण, याचवेळी नागराज त्यांच्यावर हल्ला करतो.

मधुभाऊ बेशुद्ध होण्यापूर्वी, प्रिया खोटी तन्वी असल्याची हिंट ते अर्जुनला देतात. पण, सायलीचं सत्य कोणालाही समजत नाही. सध्या सायलीची मानसिक अवस्था बिकट झाली आहे. तिला छोट्या मुलीचे भास होतात, तन्वीच्या आयुष्याशी आपण इतके काय जोडलो गेलो आहोत याबद्दल तिला आश्चर्यही वाटतंय. पण, आता या सगळ्यावर एकच मार्ग आहे तो म्हणजे मधुभाऊंची प्रकृती सुधारून त्यांना शुद्ध येणं. आता खरंच मधुभाऊ बरे होतील का? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.

मधुभाऊ व कुसुम ताई ही दोन्ही पात्रं गेल्या अनेक दिवसांपासून ‘ठरलं तर मग’ मालिकेतून गायब आहेत. आता लवकरच या दोघांची रिएन्ट्री होणार आहे. सायलीने म्हणजेच जुईने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या तिघांचं सेटवर रियुनियन झाल्याचं पाहायला मिळत आहे. सायलीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मधुभाऊ रुग्णालयात असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून मालिकेत लवकरच मधुभाऊ अन् कुसुम संदर्भात मोठा ट्विस्ट येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

जुईने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असल्याचं पाहत मिळत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे कुसुम आणि मधुभाऊ हे दोघंही ऑफस्क्रीन सुद्धा सायलीचे खूप चांगले मित्र आहेत. सायली खऱ्या आयुष्यात मधुभाऊंना मामा म्हणते. ती पोस्ट शेअर करत लिहिते, “मामा भेटले की मी मार खातेच…पण, आय लव्ह यू नारायण मामा…आम्ही आता मधुभाऊंच्या Female फॅन फॉलोइंग बाबत गप्पा मारत होतो.” या व्हिडीओमध्ये हे तिघंही एकत्र धमाल करत असल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, आता ‘ठरलं तर मग’ मालिकेत कुसुम आणि मधुभाऊंच्या रिएन्ट्रीचा सीन केव्हा दाखवणार आणि आता मालिकेत काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.