Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड झालेलं आहे. त्यामुळे सध्या सुभेदारांच्या घरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. खऱ्या तन्वीची ओळख पटल्यावर रविराज किल्लेदार आपली सगळी प्रॉपर्टी आपल्या लेकीच्या नावावर करतात. ही गोष्ट जेव्हा नागराजला समजते तेव्हा तो प्रचंड संतापतो. सायली मात्र आपल्या घरच्यांचं हे प्रेम पाहून खूपच भारावून जाते. दुसरीकडे, सायलीच्या आनंदात भर पाडणारी आणखी एक गोष्ट घडणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सायली वात्सल्य आश्रमासाठी आणि मधुभाऊंच्या सुटकेसाठी लढा देत असल्याचं पाहायला मिळत आहे. सायली आणि वात्सल्य आश्रमाचं नातं खूपच जवळचं आहे. यामुळेच आता मधुभाऊंनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

मधुभाऊ आश्रमात सगळ्या मुलांना एकत्र जमवतात आणि सांगतात, “सायली आजपासून या वात्सल्य आश्रमाची जबाबदारी तुझ्यावर आहे.” मधुभाऊंनी आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवलीये हे पाहून सायलीचे डोळे पाणवतात. ती म्हणते, “मधुभाऊ इथल्या प्रत्येक मुलीला प्रेम, न्याय, आधार नक्कीच मिळेल. तुम्ही जसं या घराला घरपण दिलंत…तसंच हे सगळं मी सुद्धा जपेन” मधुभाऊंना सुद्धा त्यांच्या लाडक्या सायलीवर पूर्ण विश्वास असतो.

एकीकडे सायलीच्या आयुष्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असताना दुसरीकडे, प्रिया जेलमधून सायलीविरोधात मोठं कारस्थान रचत असते. ती म्हणते, “सायली तुझं खूप प्रेम आहे ना वात्सल्य आश्रमावर…खूप जीव आहे ना आश्रमावर…पण, आता हाच आश्रम तुझा जीव घेईल”

आता प्रिया नेमकं काय करणार? या क्रूरतेच्या खेळात नेमकं काय घडणार? सायली आपल्या कुटुंबापासून कायमची दुरावणार की, प्रियाला चांगलाच धडा शिकवणार…हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

नेटकऱ्यांनी या प्रोमोवर असंख्य कमेंट्स केल्या आहेत. “प्रिया मान अशी काय करतेय… किती ओव्हर वाटतंय”, “जेलमधून हे सगळं कसं काय सुचतं”, “सारखं तेच तेच बघायचा कंटाळा आलाय आता”, “किती फालतुगिरी सुरूये या मालिकेत”, “प्रेक्षकांना वेडं बनवलंय” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, हा विशेष भाग २३ जुलैला रात्री ८:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे.