Tharala Tar Mag : सायलीला तिचा भूतकाळ आठवावा, खऱ्या तन्वीची ओळख सर्वांसमोर रिव्हिल व्हावी, सायलीच खरी तन्वी आहे हे सगळ्या सुभेदार कुटुंबीयांना समजलं पाहिजे ही प्रेक्षकांची गेल्या अनेक महिन्यांपासूनची इच्छा अखेर पूर्ण होणार आहे. सायलीसह प्रतिमा आणि रविराज एकाच गाडीतून प्रवास करत असतात. यावेळी हळुहळू सायलीला जुन्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात. तिचं बालपण, पूर्णा आजी, सुभेदार कुटुंबीय या सगळ्या गोष्टी सायलीच्या डोळ्यासमोरून जात असतात.

मात्र, या तिघांना संपवण्यासाठी राकेशने आधीच गाडीत गडबड केलेली असते. अर्जुन ऐनवेळी रविराजला हँडब्रेक खेचायला सांगतो आणि गाडी कंट्रोल होते. यानंतर सगळेजण सुटकेचा नि:श्वास सोडतात. पण, या दरम्यान आणखी एक छान गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे…सायलीला तिच खरी तन्वी आहे याची जाणीव होते. तिला कुटुंबातल्या सगळ्यांचे चेहरे अगदी स्पष्टपणे आठवू लागतात.

अशातच एवढ्या महिन्यांपासून कोमात असलेले मधुभाऊ सुद्धा बरे होऊन सुभेदारांच्या घरी परतणार आहे. कुसुम आणि मधुभाऊ हे दोघंही सायलीच्या आयुष्यातील हा खास क्षण पाहण्यासाठी सुभेदारांकडे उपस्थित असतात. या प्रोमोमध्ये सायलीचा लूक नेहमीपेक्षा वेगळा वाटतोय. नेहमी सिंपल साड्या किंवा चुडीदार ड्रेसमध्ये दिसणाऱ्या सायलीने या प्रोमोमध्ये मोरपिशी अन् गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस ड्रेस घातलाय. यामध्ये तिची हेअरस्टाईलही वेगळी आहे. सायलीला स्वत:ची खरी ओळख समजल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा होतो.

सायली सर्वात आधी प्रतिमाजवळ जाते आणि म्हणते, “आई मी तुझी मुलगी आहे…बाबा ( रविराजकडे पाहून ) तुम्ही मला बोट धरून चालायला शिकवलं होतं…पूर्णा आजी, तू ज्या नातीला नातसून करून घेणार होतीस ती मी आहे…आणि अर्जुन, मीच तुझी जिवाभावाची मैत्रीण! मला माझी ओळख मिळालीये. मीच तन्वी आहे!”

‘मीच तन्वी आहे!’ ही गोष्ट आता सायलीने सर्वांसमोर जाहीर केलेली आहे. आपली तन्वी दुसरी-तिसरी कोणीही नसून सायलीच आहे हे ऐकल्यावर सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा होतो. विशेषत: पूर्णा आजीचा पहिल्यापासून तन्वीवर प्रचंड जीव आहे. त्यामुळे नातीचं सत्य ऐकून तिचेही डोळे पाणावतात. आता सायली आणि अन्य सुभेदारांचं एक वेगळंच बॉण्डिंग प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग लवकरच प्रेक्षकांसमोर येईल. या प्रोमोमध्ये शेवटी सगळे कुटुंबीय एकत्र येऊन सायलीला मिठी मारत असल्याचं पाहायला मिळत आहे.