Tharala Tar Mag Fame Actors : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळेच कलाकार आता घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. ही मालिका गेली ३ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील कलाकारांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग सुद्धा तेवढंच छान आहे. शूटिंगमधून मोकळा वेळ मिळाल्यावर हे सगळे कलाकार भन्नाट रील व्हिडीओ बनवत असतात. प्रेक्षकांचा लाडका अर्जुन म्हणजेच अमित भानुशालीने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळ्या पुरुष कलाकारांनी एकत्र मिळून शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. अर्जुन, अस्मिता नवरा सचिन, अर्जुनचे बाबा प्रताप आणि अश्विन हे चौघंजण शाहरुखच्या आयकॉनिक गाण्यावर थिरकले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानचं “मैं कोई ऐसा गीत गाऊँ…” हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. १९९७ मध्ये म्हणजेच साधारण २९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘येस बॉस’ चित्रपटात हे गाणं आहे. यामध्ये शाहरुखसह लोकप्रिय अभिनेत्री जुही चावला प्रमुख भूमिकेत झळकली होती. आजही या गाण्याची लोकप्रियता तरुणाईमध्ये कायम आहे.
ट्रेडिशनल लूक आणि शाहरुखसारखी पोझ देत ‘ठरलं तर मग’च्या या कलाकारांनी सुंदर डान्स केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. शिवाय, लवकरच याचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं अर्जुनने पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. पण, या व्हिडीओमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय ते प्रताप सुभेदारांनी. सायलीच्या सासरेबुवांनी एकदम भन्नाट डान्स केलाय आणि या व्हिडीओच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रेक्षकांना त्यांच्या डान्सची झलक पाहायला मिळतेय.
कमेंट्समध्ये सुद्धा नेटकऱ्यांनी प्रताप सुभेदारांची भूमिका साकारणाऱ्या अतुल महाजन यांचं भरभरून कौतुक केलं आहे. दिशा दानडेने, “अतुल महाजन आमचे शो स्टॉपर वाह!” अशी कमेंट या व्हिडीओवर केली आहे. याशिवाय प्राजक्ता दिघे, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दबाडे या कलाकारांनी सुद्धा या चौघांचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रियाच्या भूतकाळाचा शोध अर्जुन-सायली घेत आहेत. आता प्रिया खरी तन्वी नाहीये हे सत्य जेव्हा सुभेदारांना समजणार तेव्हा ते प्रियाच्या बाबतीत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
