Tharala Tar Mag New Actress Entry : ‘ठरलं तर मग’ मालिकेत रविराजने नुकतीच त्याची सगळी प्रॉपर्टी लेकीच्या नावावर करून घेतली आहे. किल्लेदारांची खरी लेक कोण? याचा खुलासा गेल्या आठवड्यातच झाला. सायलीची खरी ओळख संपूर्ण कुटुंबासमोर उघड झाली आणि खरी तन्वी दुसरी-तिसरी कोणीही नसून सायलीच आहे याची खात्री सगळ्या सुभेदारांना पटली आहे. यानंतर रविराज-प्रतिमा मोठा निर्णय घेतात. राकेश प्रॉपर्टीचे पेपर्स शोधण्यासाठी किल्लेदारांच्या घरी जातो पण, त्याचदरम्यान अर्जुन सुद्धा तिथे पोहोचतो. अर्जुन वकिलांशी फोनवर बोलत असतो आणि नेमकं त्याचं हेच बोलणं राकेश ऐकतो. प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातून कायमचे गेले याची खंत त्याला वाटते. दुसरीकडे, प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही करताना सायलीचे डोळे भरून येतात. यावेळी सगळेच तिला धीर देतात.
खऱ्या तन्वीची ओळख समोर आल्याने सध्या सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण, या सगळ्यात प्रिया प्रचंड संतापलेली असते. आता काहीही करून सायलीचा काटा काढायचा या विचारात ती असते. यासाठीच प्रिया सचिनची मदत घ्यायचं ठरवते. काहीही करून तिला मला भेटायला पाठव असा निरोप ती सचिनला देते. पण, इथेच मुख्य ट्विस्ट आहे.
प्रियाला जेलमध्ये ओढणी घेऊन एक मुलगी भेटायला जाते. तिची ओळख, तिचं नाव काहीच रजिस्टर करून घेऊ नका याची सेटलमेंट प्रियाने आधीच करून घेतलेली असते. आता ही मुलगी नेमकी कोण आहे? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे.
आता या मुलीला प्रियाने सचिनच्या मदतीने भेटायला बोलावून घेतलंय…त्यामुळे प्लास्टिक सर्जरी करून नव्या रुपात साक्षी शिखरेच अवतरली नाही ना? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे. लवकरच याचा उलगडा होईल. या मुलीची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री संचिता कुलकर्णी साकारत आहे.
संचिता कुलकर्णीने आजवर बऱ्याच गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ‘राणी मी होणार’, ‘सुंदर आमचे घर’, ‘जाऊबाई जोरात’, ‘प्रिती परी तुजवरी’ अशा मालिकांमध्ये ती झळकली आहे. आता संचिता साकारत असलेल्या पात्राचं खरं नाव, ओळख काय आहे? हे येत्या भागात स्पष्ट होईल. याशिवाय प्रियाला ती कशी मदत करणार हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.
दरम्यान, १४ जुलैच्या भागात सायली सुद्धा प्रेक्षकांना एका नव्या लूकमध्ये दिसेल. मोकळे केस, वनपीस, गळ्यात डिझायनर मंगळसूत्र या लूकमध्ये सायली खूपच सुंदर दिसतेय.
