Tharala Tar Mag New Entry : ‘ठरलं तर मग’ मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. प्रियाचं सत्य समोर आणण्यासाठी अर्जुन-सायली प्रचंड मेहनत घेत असल्याचं सध्या मालिकेत पाहायला मिळतंय. या दोघांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रिया त्यांचा अपघात घडवून आणण्याचा प्लॅन करते. पण, अर्जुन-सायली सुदैवाने सुखरुप असतात. हे दोघंही जिवंत असल्याचं पाहून प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. आजवर प्रियाने आपल्याला बराच त्रास दिला पण, आता काही करून तिचं खरं रूप या जगासमोर आणायचं असा निश्चय अर्जुन-सायलीने केलेला आहे. यामुळेच हे दोघंही मोठा प्लॅन बनवतात.
प्रिया पैशांसाठी काहीही करू शकते याची पुरेपूर जाणीव अर्जुन-सायलीला असते. इतकंच नव्हे तर लबाड प्रियाने अश्विनशी लग्न सुद्धा केवळ पैशांसाठी केलेलं असतं. आता प्रियाचं हे खरं रुप लवकरच सर्वांसमोर येणार आहे. यासाठी अर्जुन एक प्लॅन बनवतो. प्रियाचा खोटेपणा समोर आणण्यासाठी अर्जुन अधिराजची मदत घेणार आहे. याच अधिराजची भूमिका साकारण्यासाठी मालिकेत नव्या अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेत अधिराज ही भूमिका लोकप्रिय अभिनेता गुरु दिवेकर साकारणार आहे. गुरुने आजवर ‘सावळ्याची जणू सावली’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. आता अधिराज प्रियाची चोरी पकडण्यासाठी ‘ठरलं तर मग’ मालिकेत एन्ट्री घेतोय.
अधिराज त्याच्या ड्रायव्हरला त्याच्यकडे असलेल्या संपत्तीविषयी माहिती देत असतो. मोजता येणार नाही इतका पैसा आहे वगैरे…प्रिया हे सगळं संभाषण दुरून ऐकते आणि थेट गळ्यातलं मंगळसूत्र काढून ठेवते. तिच्या मनात अधिराजच्या आयुष्यात एन्ट्री घेण्याचा विचार येतो आणि ती कॅफेमध्ये जाऊन त्याला भेटते. प्रिया अधिराजला स्वत:च्या कुटुंबाबद्दलची खोटी माहिती देते. आईला कॅन्सर झालाय, बाबांना अटॅक आलाय असं बरंच काय-काय ती खोटं सांगते. तिचा हा सगळा खोटेपणा अर्जुन गुपचूप रेकॉर्ड करून ठेवतो.
अर्जुन सायलीला म्हणतो, “प्रियाला जेवढं नाटक करायचं आहे करूदेत…आपल्या अधिराज नावाच्या ट्रॅपमध्ये ती बरोबर अडकलीये.” आता या व्हिडीओमुळे अर्जुनला प्रियाविरोधात मोठा पुरावा सापडला आहे. तिची खरी वृत्ती काय आहे हे यामुळे अश्विनसमोर उघड करण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिका सोमवार ते शुक्रवार ८:४५ ते ९:३० आणि शनिवार-रविवार ८:३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाते.
