Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली ३ वर्षे टीआरपीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवताना दिसतेय. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सुभेदारांच्या घरातील प्रत्येक पात्र आता घराघरांत लोकप्रिय झालं आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांना या मालिकेत ‘वात्सल्य आश्रम’ प्रकरणी कोर्टरूम ड्रामा पाहायला मिळाला होता. यासाठी संपूर्ण महिनाभर कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली होती. महत्त्वाचं म्हणजे, वात्सल्य आश्रम केसच्या अंतिम एपिसोडला रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळाला होता. आता पुन्हा एकदा या मालिकेची टीम प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेत लवकरच एक जबरदस्त ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहने याबाबतचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना मालिकेतील आगामी ट्विस्टची हिंट दिली आहे. “महाराष्ट्राच्या महामालिकेत उलगडणार महारहस्य” अशी पोस्ट स्टार प्रवाहकडून नुकतीच शेअर करण्यात आली आहे. यावर प्रेक्षकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ‘ठरलं तर मग’मध्ये लवकरच अपघाताचं सत्य उघड होईल आणि यामुळे सायलीचा भूतकाळ, तिची खरी ओळख कोणाला तरी समजेल अशा चर्चा सध्या कमेंट्स सेक्शनमध्ये रंगल्या आहेत.
यादरम्यान, मालिकेत सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने सेटवरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये आऊटडोअर शूट सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे आणि फोटोमधील लोकेशन पाहता रविराज-प्रतिमाचा ज्याठिकाणी २२ वर्षांपूर्वी अपघात झालेला…त्याच ठिकाणी हे शूटिंग सुरू आहे. यावरून मालिकेत लवकरच रविराज-प्रतिमाचा अपघात आणि त्याचं महिपतशी असलेलं कनेक्शन याबाबत खुलासा होण्याची दाट शक्यता आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमने या आगामी ट्विस्टसाठी प्रचंड मेहनत घेतली असून संपूर्ण टीम रात्रभर जागून शूटिंग करतेय. जुईच्या पहिल्या स्टोरीमध्ये रात्री १ वाजून २१ मिनिटं अशी वेळ पाहायला मिळतेय…संपूर्ण रात्र शूटिंग केल्यावर सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पॅकअप झाल्याची पोस्ट देखील जुईने शेअर केली आहे. “आता येत्या काही दिवसांत मालिकेचा एकही एपिसोड चुकवू नका…” असं जुईने चाहत्यांना सांगितलं आहे.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, सायली आणि अर्जुनने काहीही करून प्रतिमा आत्याचा भूतकाळ शोधून काढायचा असा निश्चय केलेला आहे. आता या दोघांना प्रतिमाच्या भूतकाळाबद्दल आणि अपघाताबद्दल काय-काय माहिती मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

