Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत एक नवा अध्याय सुरू होणार आहे. या मालिकेत आजवर प्रेक्षकांनी विविध टप्पे पाहिले आहेत. यातील पहिल्या टप्प्यात अर्जुन आश्रमाची केस जिंकतो, दुसऱ्या टप्प्यात प्रिया-नागराज-महिपत या तिघांनाही शिक्षा होते. विशेषत: प्रियाच्या पापांचा घडा भरला जातो. यानंतर आता मालिका एका महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचली आहे. प्रिया खरी तन्वी नसून, तिची ओळख बबली लोखंडे आहे, हे सर्वांसमोर उघड झालेलं आहे. त्यामुळे आता खरी तन्वी आहे तरी कोण? याचा उलगडा मालिकेत होईल.
सायली हीच खरी तन्वी असून, ती रविराज-प्रतिमाची मुलगी असते हे सत्य मधुभाऊंना समजतं. त्यांच्याशिवाय हे सत्य प्रिया-नागराजला माहिती आहे. आता मधुभाऊ आहेत कोमात आणि प्रिया-नागराज स्वत:हून कधीच सायलीची ओळख जगासमोर सांगणार नाहीत. अशा परिस्थितीत तिची खरी ओळख कशी काय सर्वांसमोर येणार? असा प्रश्न या मालिकेच्या सगळ्या चाहत्यांसमोर निर्माण झाला असेल. पण, आता लेकीच्या मदतीला तिची आईच धावून येणार आहे.
सायलीला गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे भास होत असतात. तन्वीच्या आयुष्याबद्दल आपल्याला इतकं कसं काय माहिती अशी शंका देखील सायलीच्या मनात निर्माण होते. प्रतिमा आणि सायलीचे बरेच गुणही सारखेच आहेत. अशातच या दोघी गप्पा मारत असताना प्रतिमा सायलीला एक खास गोष्ट देणार आहे.
प्रतिमा सायलीला मोठ्या प्रेमाने छोट्या तन्वीचे कपडे आणि अन्य गोष्टी दाखवत असते. याशिवाय तन्वीचा बालपणीचा आवाज देखील प्रतिमाने एका कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेला असतो. ही कॅसेट ती सायलीला देते. यातील चिमुकलीचा आवाज आणि आपल्याला एवढे दिवस जे काही भास होत आहेत…त्यात येणारा चिमुकलीचा आवाज हा सारखाच आहे, याची जाणीव सायलीला होते. एकंदर काय तर सायलीला तन्वीच्या आवाजाची ओळख पटणार आहे.
आता तन्वीचा आवाज आपल्याला ऐकू येतोय हे समजल्यावर हळुहळू सायली तिच्या भूतकाळापर्यंत पोहोचेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता सायलीला जसा तन्वीचा आवाज समजलाय, तसा तिचा चेहराही लवकरात लवकर दिसला पाहिजे अशी इच्छा अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये व्यक्त केली आहे.
दरम्यान, आता १ जूनपासून मालिकेत हे निर्णायक वळण सुरू होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘ठरलं तर मग’ मालिकेची वेळ पुन्हा एकदा ८:३० ची करण्यात आली आहे. मध्यंतरी बरेच दिवस ही मालिका सलग ४५ मिनिटं प्रसारित केली जात होती. मात्र, आता या मालिकेच्या प्रसारणाची वेळ पुन्हा एकदा अर्धा तास करण्यात आली आहे.
