Tharala Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या २२ वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती करण्याचा सीक्वेन्स चालू आहे. प्रतिमा घरी परतल्यापासून सुभेदार कुटुंबीय प्रचंड आनंदी आहेत. मात्र, घरी आलेल्या प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवत नसतो. सर्वांशी हातवारे करून ती संवाद साधत असते. आपली बायको कोणालाच ओळखत नाही, तिला काहीच आठवत नाही या विचाराने रविराज प्रचंड अस्वस्थ असतो. गेल्या काही दिवसांपासून प्रतिमाचे यासंदर्भात डॉक्टरांकडे उपचार देखील सुरू आहेत.
प्रतिमाची खोटी मुलगी म्हणून घरात वावरणाऱ्या प्रियाचा या उपचारांसाठी विरोध असतो. स्मृती परत आल्यास आपलं भांडं फुटेल अशी भीती प्रियाच्या मनात असते. मात्र, पूर्णा आजी आणि रविराज यांच्यापुढे तिचं काहीच चालत नाही. या सगळ्यात रविराजची अस्वस्थता पाहून सायली डॉक्टरांना परस्पर फोन करून प्रतिमा आत्याची स्मृती पुन्हा आणण्यासाठी आणखी काय मार्ग आहेत याबद्दल चौकशी करते. यावेळी डॉक्टर २२ वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताचं रिक्रिएशन करा असा सल्ला देतात. यानुसार सायली रविराजशी बोलते आणि पूर्णा आजीची परवानगी घेऊन सगळे जण योजनेनुसार वागू लागतात.
हेही वाचा : “Strategy त्यांच्याबरोबर करणार आणि आम्ही…”, पंढरीनाथने वर्षा उसगांवकरांना थेट विचारला जाब, नेटकरी म्हणाले, “भाऊ मस्तच…”
गाडीत बसल्यावर प्रतिमाला हळुहळू सगळ्या गोष्टी आठवू लागतात. टेम्पोवाला ठरल्यानुसार येऊन धडकणार एवढ्यात प्रतिमा “तन्वीSSS” असा आवाज सायलीला देते. गाडीतून उतरल्यावर प्रतिमाची वाचा परत आल्याचं पाहून सायलीला प्रचंड आनंद होतो. मात्र, अद्याप प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवलेला नाही. तिची केवळ वाचा परत आलेली असते.
आता सायली, रविराज आणि प्रतिमा सुभेदारांच्या ( Tharala Tar Mag ) घरी परतणार आहेत. सायली, “प्रतिमा आत्यांबद्दल एक चांगली बातमी आहे त्यामुळे वेळेत घरी या” असं अर्जुनला फोन करून सांगते. अर्जुन ही गोष्ट त्याच्याबरोबर असलेल्या प्रिया आणि चैतन्यला सांगतो. “प्रतिमाबद्दल चांगली बातमी म्हणजे…तिची स्मृती परत आली तर नसेल ना” असा विचार करून प्रिया घाबरून जाते. तिच्या पायाखालची जमीन सरकते.
प्रतिमा पूर्णा आजीला मारणार हाक…
सुभेदारांच्या घरी दारातच पूर्णा आजी सगळ्यांची वाट पाहात उभी असते. एवढ्यात रविराज आणि सायली येतात. तर, मागून येणारी प्रतिमा “पूर्णाई…” असा आवाज देते. लेकीच्या तोंडून तब्बल २२ वर्षांनी ‘पूर्णाई’ ऐकल्यावर आजीला अश्रू अनावर होतात. ती प्रचंड भावुक होते. या मायलेकी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. हा क्षण ऑफिसहून परतलेले अर्जुन, चैतन्य आणि प्रिया देखील पाहतात. हा सुंदर क्षण पाहून सगळेच आनंदी होतात. फक्त प्रिया मनातल्या भावना चेहऱ्यावर दाखवत नाही…तिला प्रचंड दडपण आलेलं असतं. आता आगामी भागात प्रतिमाला भूतकाळ केव्हा आठवणार आणि प्रियाचा खोटेपणा केव्हा उघड होणार हे पाहणं ( Tharala Tar Mag ) महत्त्वाचं ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd