Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायलीच्या भूतकाळाचा सीक्वेन्स सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून तिला वेगवेगळे भास होत असतात…जुन्या सगळ्या गोष्टी सायलीला स्पष्टपणे आठवत आहेत. यावरून आपणच खरी तन्वी आहोत असा विश्वास सायलीच्या मनात निर्माण होतो. मात्र, भूतकाळाबाबत पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी… ती मधुभाऊंची भेट घ्यायचं ठरवते आणि रुग्णालयात जाते. यावेळी मधुभाऊ सुद्धा पापण्यांची उघडझाप करून, ‘खरी तन्वी तूच आहेस’ असे संकेत सायलीला देतात.

सायली रडत-रडत मंदिरात जाते आणि देवीआईसमोर प्रार्थना करते. यावेळी अर्जुन सुद्धा तिथे पोहोचतो. या सगळ्या गोष्टी ती अर्जुनला सांगते. सायलीचं म्हणणं ऐकल्यावर अर्जुनला सुद्धा सायलीच खरी तन्वी असल्याची खात्री पटते. पण, सायलीला स्वत:ची खरी ओळख सर्वांसमोर सिद्ध करण्यासाठी आणखी पुराव्यांची आवश्यकता भासणार आहे. आता सायलीच खरी तन्वी आहे हे अर्जुन कसं सिद्ध करणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेलं.

प्रिया जवळपास तीन-साडेतीन वर्ष खोटी तन्वी होऊन सुभेदारांच्या घरात वावरत होती. त्यामुळे तिला सुद्धा तन्वी नेमकी कोण आहे, तिची ओळख माहिती असणार याची खात्री सायलीला असते. यासाठी सायली प्रियाला भेटण्यासाठी जेलमध्ये जात असते. पण, इतक्यात सुभेदारांच्या दारात प्रिया नावाचं वादळ येऊन थांबलेलं असतं.

‘ठरलं तर मग’ मालिकेत आता पुन्हा एकदा प्रियाची रिएन्ट्री होणार आहे. प्रिया गरोदर असल्याने तिची जेलमधून सुटका झालेली आहे. प्रियाला सुभेदारांच्या घरात आलेलं पाहताच कल्पना, अस्मिता, सायली, अश्विन सर्वांनाच धक्का बसतो. कल्पना तिला ‘चालती हो’ असंही सांगते. पण, प्रिया रडण्याचं नाटक करत म्हणते, “माझ्या पोटात अश्विनचं बाळ आहे!”

प्रियाने गरोदर असल्याचं सांगताच सायली तिला म्हणते, “प्रिया तू खोटारडी आहेस” यावर प्रिया लगेच उत्तर देते, “हवं तर अर्जुनला विचार…त्याला सुद्धा हे माहितीये आणि त्याला विचार हे सत्य त्याने तुझ्यापासून का लपवलं?”

प्रियाचा खुलासा ऐकून सायली अविश्वासाने अर्जुनकडे पाहते. खरंतर, अश्विनने शपथ घातल्यामुळे अर्जुन हे सगळं घरातल्यांपासून लपवतो. पण, आता प्रियाची रिएन्ट्री झाल्याने अर्जुनला हे सत्य लपवणं महागात पडणार आहे.

प्रियाच्या रिएन्ट्रीने आता मालिकेला एक नवीन वळण मिळणार आहे. येत्या २१ जूनला म्हणजेच या रविवारी ‘ठरलं तर मग’ मालिकेचा महाएपिसोड दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता प्रसारित केला जाईल. आता प्रियाला सुभेदार स्वीकारणार की नाही? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.