‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायली मिळून साक्षीविरोधात पुरावे शोधत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. चैतन्यला लवकरात लवकर साक्षीपासून दूर करायचं अशी योजना अर्जुनच्या मनात असते. परंतु, चैतन्य मित्राचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. अशातच अर्जुनच्या कॉलेजमधील रियुनियन पार्टीला सायलीला एक जुना फोट सापडतो. या फोटोमुळे मालिकेत काय ट्विस्ट येणार जाणून घेऊयात…

अर्जुन त्याच्या रियुनियन पार्टीला सायलीला घेऊन जातो. सगळ्यांशी ओळख करून देतो. याठिकाणी सायली नवऱ्यासाठी खास गाणं देखील गाते. एकीकडे सायली-अर्जुनचं नातं दिवसेंदिवस बहरत असताना दुसरीकडे चैतन्य मात्र साक्षीचा जाळ्यात आणखी ओढला जातो. रियुनियन पार्टीला तो साक्षीबरोबर येतो आणि सगळ्या मित्रांना आम्ही लवकरच लग्न करणार आहे असं सांगतो. चैतन्यचे विचार ऐकून अर्जुनला मित्राची काळजी वाटते.

हेही वाचा : “महाराष्ट्र सरकार आणि सायबर सेलकडे…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाची चिन्मय मांडलेकरसाठी पोस्ट, म्हणाले…

घरी परतल्यावर सायली अर्जुनला एक जुना फोटो दाखवून ‘ही साक्षीच आहे ना?’ आणि ‘ही तुमच्या जुन्या कॉलेजच्या फोटोमध्ये काय करतेय?’ अशी विचारपूस करते. यावर अर्जुन म्हणतो, “हो! ही साक्षीच आहे…याचा अर्थ कुणालची गर्लफ्रेंड साक्षी होती आणि तिने नाकारल्यामुळे कुणालने आत्महत्या केली होती.”

हेही वाचा : “मी क्षिती जोग, नवऱ्याचं नाव हेमंत ढोमे”, वेगळ्या आडनावांमुळे अभिनेत्रीच्या घरी घडलेला ‘असा’ किस्सा; म्हणाली…

अर्जुनने सांगितलेलं सत्य ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो. आता लवकरात लवकर चैतन्यला सावध केलं पाहिजे असं दोघंही ठरवतात. शेवटी अर्जुन चैतन्यला फोन करतो आणि घरी ये असं सांगतो. परंतु, चैतन्य कोणालाही न सांगता सुभेदारांकडे साक्षीला घेऊन जातो. साक्षीला घरी आलेलं पाहताच पूर्णा आजी, कल्पना सगळेच आश्चर्यचकीत होतात. कारण, सगळेच जण तिचा तिरस्कार करत असत्ता. परंतु, अर्जुननेच आम्हाला बोलवलंय असं सांगून चैतन्य त्याच्या खोलीत जातो.

चैतन्यबरोबर साक्षीला पाहून अर्जुन भयंकर संतापतो “हिला इथून पाठव मला तुझ्याशी एकट्याचं बोलायचंय” असं तो सांगतो. परंतु, “जे काही बोलायचंय ते साक्षीसमोर बोल” असं चैतन्य अर्जुनला सांगतो. सायली सगळा प्रकार बघत असते. दोघांनाही चैतन्यची समजूत कशी काढावी काहीच समजत नसतं. पण, शेवटी अर्जुन, “तुला जे सांगायचंय ते अतिशय महत्त्वाचं असून मी साक्षीसमोर सांगू शकत नाही” असं थेट चैतन्यला सांगतो. आता अर्जुनचा सल्ला चैतन्य ऐकणार का? की, पुन्हा एकदा मित्राला डावलून चैतन्य साक्षीची बाजू घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.