Tharala Tar Mag Promo : ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. प्रिया इतके वर्षं सुभेदारांच्या घरात खोटी तन्वी म्हणून वावरत असते. ती रविराज-प्रतिमाची खरी मुलगी नसते. काही महिन्यांपूर्वीच हे सत्य मधुभाऊंना समजलं होतं. पण, नागराज मधुभाऊंवर लगेच हल्ला करतो आणि यामुळे ते कोमात जातात.
मधुभाऊंची प्रकृती बिघडल्यामुळे अर्जुन खऱ्या तन्वीच्या सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण, आता लवकरच ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा धमाका होणार आहे. प्रिया खरी तन्वी नाहीये हे सत्य अखेर अर्जुन-सायलीसमोर उघड होणार आहे.
सायली प्रियावर सतत लक्ष ठेवून असते…अशातच प्रिया गोड बोलून अश्विनकडून पैसे उकळते आणि थेट सदा-मैनाच्या घरी जाते आणि त्यांना पैसे देते. प्रिया या दोघांना पैसे का देतेय? अशी शंका सायलीच्या मनात निर्माण होते. म्हणूनच प्रिया गेल्यावर या गोष्टीचा सायली सदा-मैनाला जाब विचारते. अर्थात या सगळ्या गोष्टी अर्जुनपर्यंत पोहोचतात.
यानंतर सदा-मैनाने त्यांच्या पोटच्या पाचव्या मुलीला विकलं होतं हे सत्य अर्जुन-सायलीसमोर उघड होतं… आणि हे दोघंही पुढचा तपास करण्यासाठी शाळेत पोहोचतात. शाळेच्या रजिस्टरमध्ये प्रियाचा बालपणीचा फोटो लावलेला असतो आणि त्याठिकाणी बबली सदा लोखंडे असं नाव असतं. हे नाव पाहताच प्रियाची खरी ओळख ‘तन्वी’ नसून ती ‘बबली’ आहे याचा उलगडा अर्जुन-सायलीसमोर होतो.
आता शाळेचं रजिस्टर पाहिल्यावर प्रिया ही तन्वी नाहीये याची खात्री अर्जुनला पटते. आता हे सगळं अर्जुन-सायली सुभेदारांना आणि किल्लेदार कुटुंबीयांना कसं सांगणार? प्रियाची खरी ओळख बबली असेल तर अजूनही तन्वी कोण हे सत्य सर्वांसमोर आलेलं नाहीये. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं खूपच रंजक होणार आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अखेर सत्य समोर आलंच”, “आता प्रिया कितीही नाटक करो चांगल्या सुनेचं… अर्जुन-सायली तुझी वाट लावायला सज्ज आहेत”, “नंबर एक मालिका”, “आता सगळे पुरावे मिळाल्यावर मधुभाऊ बरे होतील”, “आता सुभेदार या दोघांवर विश्वास ठेवणार नाहीत” अशा बऱ्याच कमेंट्स या मालिकेच्या प्रोमोवर आल्या आहेत.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका सध्या सोमवार ते शुक्रवार रात्री ८:४५ ते ९:३० वाजता आणि शनिवारी-रविवार नेहमीच्या वेळेत रात्री ८:३० वाजता प्रसारित केली जाते.
