Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायली-अर्जुन सुमन काकूंचा शोध घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान सुभेदारांनी पहिल्यांदाच अर्जुन-सायलीची पहिली संक्रांत मोठ्या थाटामाटात साजरी केली. या कार्यक्रमात भूमी, सखी आणि काव्याला नागराजवर संशय येतो. त्या तिघीजणी नागराजच्या फोनमध्ये सुमन काकूंचा व्हिडीओ पाहतात. नागराजचा फोन ताब्यात घेऊन काव्या मोठ्या हुशारीने हा व्हिडीओ सायलीला पाठवते. आता यामुळे सुमनच्या अपहरणामागे नागराजचा हात आहे यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे.

दुसरीकडे, सुमन सुद्धा नवऱ्याच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करत असते. सुमन हळूच तिचा फोन ऑन करते; ज्यामुळे तिचं लोकेशन पोलिसांपर्यंत पोहोचतं. पोलीस लगेच अर्जुनला फोन करून याबाबत कल्पना देतात. आता सुमन सापडणार की त्याआधीच नागराज तिला दुसऱ्या जागी घेऊन जाणार हे आगामी भागात स्पष्ट होईल. मात्र, याचदरम्यान मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार आहे.

आता लवकरच नागराजचा महिपतशी आणि रविराज-प्रतिमाच्या अपघाताशी जवळचा संबंध असल्याचं देखील सर्वांसमोर उघड होणार आहे. चैतन्य महिपतच्या घरात तपास करण्यासाठी कोर्टाकडून परवानगी मिळवतो. यानंतर चैतन्यसह अर्जुन-सायली, स्थानिक पोलीस अधिकारी असे सगळेजण महिपतच्या घरात तपास करण्यासाठी जातात. इथेच त्यांच्या हातात एक मोठा पुरावा सापडणार आहे.

महिपतच्या घरात शोधाशोध करताना त्यांना लहान सुटकेस सापडते आणि यात एक फाइल लपवलेली असते. ही फाइल हॉस्पिटलमधील कागदपत्रांची असावी असा प्राथमिक अंदाज प्रोमो पाहून येत आहे. या फाइलमध्ये काही कागदपत्र आणि ‘NK’ लिहिलेली चिठ्ठी असते. आता हा ‘NK’ कोण आहे असा प्रश्न अर्जुनच्या मनात निर्माण होतो. इतक्यात सायली लगेच म्हणते, नागराज किल्लेदार…! सुभेदारांच्या सुनेचा खुलासा ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. सर्वांचा नागराजवर असलेला संशय खरा ठरणार आहे.

अखेर नागराज किल्लेदारचा खेळ संपला असून त्याची चोरी पकडली जाणार आहे. कारण, २२ वर्षांपूर्वी घडलेल्या रविराजच्या अपघाताशी नागोबाचा थेट संबंध असल्याचं अर्जुन-सायलीसमोर सिद्ध झालं आहे. आता अर्जुन-सायली नागराजबाबत काय निर्णय घेणार? सुमनची सुटका होईल का? सुमन पुन्हा घरी आल्यावर ती नवऱ्याची पोलखोल करणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या सोमवारी प्रसारित होणाऱ्या भागात दाखवली जातील. दरम्यान, हा विशेष भाग २६ जानेवारीला रात्री ८:३० वाजता ऑन एअर होईल.