Tharala Tar Mag Arjun Sayali New Look : ‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अर्जुन-सायली २२ वर्षांपूर्वी घडलेल्या रविराज-प्रतिमाच्या अपघाताचा मुख्य मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध घेत होते. अखेर नागराजचं सत्य आता सर्वांसमोर उघड झालेलं आहे. नागराज अपघाताच्या केसमधून पुराव्यांअभावी निर्दोष सुटतो. पण, सुमन त्याला छळ केल्याप्रकरणी पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवते. यावेळी सुमनच्या पाठिशी सायली अन् प्रतिमा ठामपणे उभ्या राहतात.
गेले काही महिने ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रेक्षकांना सतत कोर्टरूम ड्रामा, अपघाताचं रहस्य असा ट्रॅक पाहायला मिळतोय. पण, आता लवकरच मालिका नवीन वळण घेणार आहे. यात प्रेक्षकांचे लाडके अर्जुन-सायली एका नव्या रूपात तुमच्यासमोर येतील. मालिकेत आता व्हॅलेंटाइन स्पेशल आठवडा सुरू होणार आहे. यात नेमकं काय घडणार जाणून घेऊयात…
सायली-अर्जुनच्या भूमिका अन् जबाबदाऱ्या दोन्ही बदलणार आहेत. आता नेहमी सूट घालून फिरणारा अर्जुन आपल्याला किचनमध्ये काम करताना दिसेल. तर, सायली आता ऑफिसची जबाबदारी सांभाळणार आहे.
सायली-अर्जुन एका महत्त्वाच्या विषयावर बोलत असतात. इतक्यात स्वयंपाक घरातून सायलीला कूकरच्या शिट्टीचा आवाज येतो म्हणून ती गॅस बंद करण्यासाठी जायला निघते. ती अर्जुनला म्हणते, “अगंबाई कूकरची शिट्टी वाजली मी आलेच हा” यावर अर्जुन तिला जरा चिडून म्हणतो, “मी इथे कामाचं बोलतोय आणि तुला कूकरच्या शिट्टीची पडलीये.”
पुढे सायली नवऱ्याला सांगते, “तुमच्या ऑफिसच्या कामापेक्षा घरचं काम जास्त महत्त्वाचं आहे” यावर अर्जुन तिला सांगतो, “तुला ऑफिसचं काम एवढं सोपं वाटतंय? मग होऊन जाऊदेत अदलाबदली…” सायली सुद्धा नवऱ्याशी डील करते आणि दोघंही आता आपल्या कामांची अदलाबदल करणार आहेत.
सायली अर्जुनला म्हणते, “मग आजपासून घर तुम्ही सांभाळणार” आणि आता पुढचे काही दिवस सायली ऑफिस सांभाळणार आहे. ‘ठरलं तर मग!’ म्हणत या दोघांमध्ये कामांची अदलाबदल करायची अशी डील होते. आता या दोघांमध्ये कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
या व्हॅलेंटाईन स्पेशल वीकसाठी दोघांचे लूक बदलण्यात आले आहेत. अर्जुन टी-शर्ट, त्यावर किचनमध्ये काम करताना वापरलं जाणारं एप्रन, हातात चमचा आणि खांद्यावर गमछा घेतलेल्या लूकमध्ये दिसतोय. तर, दुसरीकडे सायलीने मॉडर्न लूक करून हातात ऑफिसच्या फाइल्स घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग ९ फेब्रुवारीपासून रात्री ८:३० वाजता प्रसारित केला जाईल.

