Tharala Tar Mag Promo : प्रेक्षक ज्या क्षणाची गेल्या साडेतीन वर्षांपासून वाट पाहत होते…तो क्षण अखेर ‘ठरलं तर मग’ मालिकेत आलेला आहे. खरी तन्वी दुसरी-तिसरी कोणीही नसून सायलीच आहे याचा उलगडा मधुभाऊंमुळे झालेला आहे. प्रियाला अटक झाल्यापासून सायली खऱ्या तन्वीच्या भूतकाळाचा शोध घेत असते. यादरम्यान तिला सुभेदारांच्या घरात, गार्डन परिसरात छोट्या तन्वीचे भास होऊ लागतात. प्रतिमाशी चर्चा केल्यावर सायलीला स्वत:च्या आणि तन्वीच्या बऱ्याच सवयींमध्ये साम्य आढळतं. दोघी सारखीच गाणी गात असतात, दोघींनी बालपणी काढलेली चित्रंही सारखीच असतात.
या भूतकाळातील गोष्टी समोर येऊ लागताच सायली प्रचंड अस्वस्थ होते. ती रुग्णालयात जाऊन मधुभाऊंची भेट घेण्याचं ठरवते. मधुभाऊंना ती रडत-रडत आपल्या भूतकाळाची ओळख विचारते. मधुभाऊ कोमात असल्याने सुरुवातीला सायलीला कोणताही प्रतिसाद मिळत नाही. पण, त्यानंतर डोळ्यांनीच ते सायलीच खरी तन्वी असल्याचे संकेत तिला देतात.
सायलीला तिचा भूतकाळ हळुहळू आठवत जातो आणि यामुळे तिला खूप मोठा धक्का बसतो. आपणच खरी तन्वी आहोत हे सिद्ध करण्यासाठी सायलीला पुराव्यांची गरज असते. त्यामुळे ती रडत-रडत देवळात जाते आणि देवीआईसमोर आपली व्यथा मांडते. इतक्यात देवळात अर्जुन सुद्धा पोहोचतो. तो वेळीच जाऊन सायलीला सावरतो…आणि तिला धीर देतो.
अर्जुन बायकोला आवाज देतो, “सायली…” यावर सायली पुढे म्हणते, “सायली की तन्वी? कारण, तन्वीचा आवाज मला माझा आवाज वाटतो, तन्वीचं गाणं… तन्वीच्या सगळ्या गोष्टी माझ्यासारख्याच आहेत. मधुभाऊंनी सुद्धा या गोष्टीची कबुली दिलीये. या सगळ्याचा अर्थ काय असू शकतो?”
सायलीचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यावर अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो बायकोला जवळ घेतो आणि म्हणतो, “याचा अर्थ एकच…कदाचित तूच तन्वी आहेस.”
आता सायलीच खरी तन्वी आहे सिद्ध करण्यासाठी अर्जुन-सायलीला पुराव्यांची आवश्यकता भासणार आहे. आता अर्जुन सायलीची खरी ओळख सर्वांना केव्हा सांगणार? सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य समोर आल्यावर सुभेदारांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “तीन वर्षांनी सत्य समजणार”, “आता अर्जुन बायकोची ओळख कशी सिद्ध करणार हे पाहायला मजा येईल”, “खरी ओळख समजली बाबा एकदाची”, “फायनली आता मजा येणार” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत. ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग बुधवारी १७ जून रोजी रात्री ८:३० वाजता प्रसारित केला जाईल.
