Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’मध्ये अखेर सर्वात मोठा खुलासा झालेला आहे. रविराज व प्रतिमाच्या २२ वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताचा मुख्य मास्टरमाइंड दुसरा-तिसरा कोणी नसून नागराज किल्लेदार असल्याचं सर्वांसमोर उघड झालेलं आहे. सुमनने अर्जुन-सायलीला मदत केल्यामुळे नागराज भयंकर संतापतो आणि घरी आल्यावर तिला मारहाण करतो. यादरम्यान तो ‘२२ वर्षांपूर्वी झालेल्या रविराज-प्रतिमाच्या अपघाताला मी जबाबदार आहे’ अशी कबुली बायकोसमोर देतो.
सुदैवाने नागराज गुन्ह्याची कबुली देत असल्याचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि त्या व्हिडीओमुळे किल्लेदार कुटुंबीयांसमोर नागराजचा खरा चेहरा उघड होतो. नागराजचं सत्य आता सुभेदारांना सुद्धा समजणार आहे. यामुळे प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. पण, या सगळ्यात सर्वात जास्त दु:ख होतं ते रविराज किल्लेदारांना. आपला सख्खा धाकटा भाऊ आपल्या जीवावर उठलाय हे सत्य समजल्यावर रविराज स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतात. त्यांची मनधरणी करण्यासाठी सगळे पुढे येतात पण, जेव्हा सायली ‘बाबा’ म्हणून आवाज देते तेव्हाच रविराजला आपुलकीची जाणीव होते आणि ते दार उघडतात.
आता किल्लेदारांनी नागराजला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. पण, पुराव्यांच्या अभावी त्याची निर्दोष सुटका करण्यात येणार आहे. इतका मोठा गुन्हा करून आपण सहज सुटलो अशी भावना नागराजच्या मनात येते. पण, इतक्यात नागोबाला अद्दल घडवण्यासाठी त्याची बायको सुमन पुढाकार घेते. बायकोला केलेल्या मारहाणीप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
सायली त्याला म्हणते, “नागराज तुझी २२ वर्षांपूर्वीच्या अपघाताच्या गुन्ह्यातून पुरावे नाहीत म्हणून सुटका झालीये. पण, बायकोवर केलेल्या अत्याचाराचं काय? त्यातून तुझी सुटका नाहीच. इन्स्पेक्टर FIR नोंदवा… आता तुझी सुटका नाही.” हे ऐकून नागराजच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. आता नागराजच्या विरोधात ठामपणे प्रतिमा, सायली आणि सुमन ही स्त्रीशक्ती उभी रहाणार आहे.
पण, हा प्रोमो पाहून नेटकरी गोंधळले आहेत. “ज्या व्हिडीओमध्ये नागराज स्वत: गुन्ह्याची कबुली देतोय…तो व्हिडीओ पुरावा म्हणून पुरेसा का नाहीये?”, “त्या नागराजला जेलमध्ये टाकण्यापेक्षा एकदा लेखकाला आणि डायरेक्टरला जेलमध्ये टाका”, “अरे पुरावा आहे ना मग हा कसा काय सुटला”, “त्याने स्वत: कबुल केलंय आता का स्टोरी स्लो करताय” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग मंगळवारी ३ फेब्रुवारीला प्रसारित केला जाणार आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

