‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रिया आणि नागराजने मिळून प्रतिमाच्या मृत्यूचं खोटं कारस्थान रचल्याचा सीक्वेन्स चालू आहे. खरंतर, रविराज किल्लेदारची बायको आणि सायलीची खरी आई प्रतिमा जिवंत असते. परंतु, तिच्या मृत्यूचा खोटा बनाव रचून प्रियाला किल्लेदारांची प्रॉपर्टी नावावर करून घ्यायची असते. यामध्ये नागराज सुद्धा भागीदार होणार असतो. यामुळेच दोघे मिळून नर्सला खोटे रिपोर्ट्स बनवायला सांगतात आणि प्रतिमाच्या मृत्यूचं खोटं नाटक रचतात.

डॉक्टरांनी रिपोर्ट्स दाखवल्याने प्रतिमा या जगात नाही यावर रविराजचा विश्वास बसतो. पण, तेवढ्यात पूर्णा आजीला सायलीच्या रुपात प्रतिमा जिवंत असल्याचा भास होतो आणि तिच्या (प्रतिमा) फोटोला हार घालू नका असं ती रविराजला सांगते. सायली अगदी काही वेळातच घरातल्या सर्वांना आपलंसं करून घेते. हे पाहून प्रियाचा जळफळाट होतो.

हेही वाचा : Video: “आनंदी कुठे गेली?”, ‘मन धागा धागा जोडते नवा’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, मालिका घेणार ६ वर्षांचा लीप

रविराज किल्लेदार आपली बायको या जगात नाही हे सत्य स्वीकारायला तयार नसतात. त्यामुळे सायली त्यांची समजून काढून स्वत:च्या हाताने त्यांना जेवण भरवते. हे सगळं पाहून प्रियाचा राग अनावर होतो. तर, दुसरीकडे सायली एकदम प्रतिमासारखी वागतेय हे पाहून रविराज आणि पूर्णा आजी आश्चर्य व्यक्त करत असतात. अशातच किल्लेदारांच्या स्वयंपाक घरात काम करताना सायलीला भूतकाळ आठवू लागतो. प्रतिमाबरोबर लहान मुलगी खेळ खेळतेय आणि तिला आई…आई आवाज देतेय असा भास सायलीला होतो. हा भास नक्की का होतोय याचं कारण तिला समजू शकत नाही. सायलीच खरी तन्वी असल्याने तिला किल्लेदारांच्या घरी आल्यावर तिचं बालपण आठवत असतं. पण, स्मृती गेल्याने सायलीला तिची खरी ओळख माहिती नसते. सगळे झोपल्यावर ती याबाबत विचार करत असते… प्रियाच्या खोलीबाहेर सायली उभी राहते. त्याचवेळी आतून तिला प्रिया रुग्णालयातील नर्सशी खोट्या रिपोर्ट्सबद्दल बोलत असल्याचं ऐकायला येतं.

हेही वाचा : शत्रुघ्न सिन्हांनंतर आता सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल तिच्या भावाची प्रतिक्रिया, म्हणाला, “मी सध्या…”

प्रियाने रुग्णालयाच्या नर्सकडून प्रतिमाचा मृत्यू झाल्याचे खोटे रिपोर्ट्स बनवून घेतलेले असतात. परंतु, याबाबत नागराजसोडून इतर कोणालाही कल्पना नसते. सायली तिचं फोनवरचं संभाषण ऐकून दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाला सर्वांसमोर जाब विचारते. “तू काल कोणत्या रिपोर्ट्स बोलत होतीस? कसले खोटे रिपोर्ट्स?” सायलीचा प्रश्न ऐकताच प्रियाची बोबडी वळल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सायलीने चोरी पकडल्यावर आता सगळ्या कुटुंबीयांसमोर प्रिया काय उत्तर देणार? दरवेळीप्रमाणे ती सोयीस्कररित्या यातून मार्ग काढणार की अर्जुन या प्रकरणाचा शोध घेणार हे आपल्याला आगामी भागात पाहायला मिळणार आहे.