छोट्या पडद्यावरील मालिकांमधील काही क्षण हे कथानकाला फक्त वेगळं वळण देणारे नसतात, तर ते प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून जातात. ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्येही असा एक अविस्मरणीय क्षण आता साकार होणार आहे. गेली साडेतीन वर्षे ज्या सत्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, ते अखेर समोर आलं आहे. सायली हीच तन्वी असल्याचं सर्वात मोठं रहस्य उलगडणार असून, तिच्या आयुष्यातील हा भावनिक क्षण प्रत्येक प्रेक्षकाला भारावून टाकणार आहे.

आतापर्यंत अनेक संकटांना सामोरी गेलेली सायली अखेर स्वतःची हरवलेली ओळख परत मिळवणार आहे. तिच्या आयुष्यातील या नव्या पर्वाची सुरुवात एका हृदयस्पर्शी गीताने होणार आहे. सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांनी लिहिलेल्या आणि निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीतांचं सुभाष नकाशे यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. या गाण्यातून सायलीच्या प्रवासातील प्रत्येक भाव, प्रत्येक संघर्ष आणि तिच्या नव्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यात आला आहे. सायलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी स्टार प्रवाह परिवारातल्या नायिकाही ‘ठरलं तर मग’मध्ये खास हजेरी लावणार आहेत.

या विशेष प्रसंगाविषयी अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली, “सायलीचं तन्वी असणं हा केवळ कथानकातील ट्विस्ट नाही, तर तिच्या संपूर्ण प्रवासाचं सार आहे. हा प्रसंग इतक्या सुंदर पद्धतीने साकारला आहे की शूटिंग करतानाही अनेकदा डोळे पाणावले. प्रेक्षक सायलीवर मनापासून प्रेम करतात. सायली आजारी पडली की तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. हे पाहून कायम भारावून जायला होतं. एका कलाकारासाठी यापेक्षा मोठं बक्षीस असूच शकत नाही. हा क्षण प्रेक्षकांनाही तितकाच भावेल, याची मला खात्री आहे.”

दरम्यान, हा विशेष भाग ८ जुलैला प्रदर्शित केला जाईल. आता ८ जुलैला सायलीला काय सरप्राइज मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. कारण, या पार्टीचं आमंत्रण संपूर्ण महाराष्ट्राला देण्यात आलं आहे. यादिवशी आणखी एक खास गोष्ट घडणार आहे. खऱ्या आयुष्या जुईचा वाढदिवस सुद्धा ८ जुलैलाच असतो आणि ‘ठरलं तर मग’च्या विशेष भागाचं प्रसारण सुद्धा ८ जुलैलाच करण्यात येणार आहे. यासाठी ‘स्टार प्रवाह’च्या सगळ्या नायिका पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सखी, नंदिनी, आनंदी, ईश्वरी, जानकी, नुपूर, कृष्णा आणि काव्या या सगळ्याजणी सायलीला सरप्राइज देण्यासाठी एकत्र आल्या आहेत.