Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी सायली महत्त्वाची योजना आखत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतिमाला जुन्या गोष्टी कशा आठवतील यासाठी सुभेदार कुटुंबीय रोज नवनवीन प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. रविराजच्या नकळत सायली प्रतिमाच्या डॉक्टरांना फोन करून तिची स्मृती परत आणण्यासाठी आणखी काय-काय मार्ग आहेत याची चौकशी करते. यावेळी अपघाताच्या त्या क्षणाची पुनरावृत्ती करावी असा मार्ग तिला डॉक्टर सुचवतात. पण, यात प्रतिमाच्या जीवाला धोका देखील निर्माण होण्याची शक्यता असते.

सायली याबद्दल रविराज किल्लेदारांशी चर्चा करायचं ठरवते. सुरुवातीला सर्वांच्या नकळत डॉक्टरांना फोन केल्यामुळे ती रविराज यांची माफी मागते. यानंतर डॉक्टरांनी दिलेला सल्ला ती त्यांना सांगते. सायलीची कल्पना ऐकून रविराज देखील अपघाताच्या क्षणाची पुनरावृत्ती करण्यास तयार होतात. पूर्णा आजी सुरुवातीला याला विरोध करते. मात्र, रविराज आणि सायली ठामपणे तिच्यासमोर स्वत:ची बाजू मांडतात.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : कॅप्टन्सी कार्यात धक्काबुक्की! घरातील ‘हे’ चार सदस्य टास्कमधून झाले बाद, ‘त्या’ फोटोमुळे झालं उघड

अपघाताची २२ वर्षांनी पुनरावृत्ती

एकीकडे रविराज आणि सायली ही योजना आखत असताना दुसरीकडे, अर्जुन प्रियाच्या पायावर खरंच जन्मखूण आहे की नाही? याचा शोध घेण्यासाठी तिला ऑफिसमध्ये बोलावतो. प्रियाच्या पायात काच रुतते तेव्हाच अर्जुन तिची जन्मखूण पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. यात त्याला यश मिळणार की नाही हे आगामी भागात स्पष्ट होईल. अर्जुन प्रियाच्या मागावर असताना इकडे सायली, रविराज अपघाताचा क्षण रिक्रिएट करण्यासाठी टेम्पो वाल्याला फोन करून प्रतिमाची समजूत काढतात.

ठरलं तर मग ( Tharala Tar Mag )

रविराज गाडी चालवत असताना प्रतिमा त्यांच्या बाजूच्या सीटवर बसते. तर, सायली मागच्या सीटवर बसणार आहे. त्याच रस्त्यावर पुन्हा एकदा गाडी चालवताना प्रतिमाला अपघाताचा जुना क्षण पुन्हा आठवू लागतो. टेम्पो गाडीला धडकणार असं वाटताच क्षणी प्रतिमा जोरात “तन्वीSSS…” असं ओरडत असल्याचं या नव्या प्रोमोमध्ये ( Tharala Tar Mag ) पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “Wildcard नाही ‘चाइल्ड’ कार्ड आहे”, संग्रामची अरबाजशी हातमिळवणी; खेळ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “दुसरा वैभव…”

मालिकेचा हा विशेष भाग २० सप्टेंबर रात्री ८.३० वाजता प्रदर्शित केला जाणार आहे. आता प्रतिमाने प्रोमोमध्ये तन्वीचं नाव घेतल्याने तिची स्मृती खरंच परत येणार का? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रतिमाची स्मृती खरंच परत आली तर ती आपल्या लाडक्या लेकीला ओळखू शकेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण, या सगळ्यात नेहमी शांत, अबोल आणि आजवर फक्त हातवारे करून संवाद साधणारी प्रतिमा पहिल्यांदाच लेकीचं नाव घेत “तन्वीSSS” असं ओरडली आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोची ( Tharala Tar Mag ) सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.