Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अखेर पोलिसांनी प्रियाला आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. खोटारड्या प्रियाची खरी ओळख, ती तन्वी नसल्याचं सत्य…असे तिचे सगळे कारनामे सायली-अर्जुन दोघंही मिळून सुभेदारांसमोर उघड करतात. आपल्या घरात तन्वी बनून राहणारी मुलगी खरी बबली लोखंडे आहे, हे सत्य जेव्हा सुभेदारांना समजतं तेव्हा सगळेच कुटुंबीय शॉक होतात. विशेषत: यामुळे पूर्णा आजीला मोठा मानसिक धक्का बसतो.

पूर्णा आजीचा तन्वीवर बालपणापासून खूप जास्त जीव असतो. पण, प्रिया इतके दिवस आपल्या नातीच्या नावाने घरात खोटेपणा करत राहिली… या सगळ्याचा पूर्णा आजीला भयंकर त्रास होतो. सध्या पूर्णा आजीची मानसिक धक्क्याने स्मृती गेल्याचं मालिकेत पाहायला मिळतंय. पण, यादरम्यान एक वेगळीच गोष्ट घडते ती म्हणजे, पूर्णा आजी तिच्याही नकळत सायलीला ‘तन्वी’ अशी हाक मारते…आणि तिलाच आपली खरी नात समजते.

सायलीसह अन्य सुभेदारांनी सायलीची खरी ओळख पूर्णा आजीला सांगण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण, याचा काहीच उपयोग होत नाही. शेवटी पूर्णा आजीच्या प्रकृतीचा विचार करताना सायली तन्वी होण्याचं नाटक करतेय.

पण, आपणच खरी तन्वी आहोत हे सत्य अद्याप सायलीला सुद्धा माहिती नाहीये. अशातच पूर्णा आजी तिला प्रेमाने बालपणीची बालगीतं म्हणायला सांगते. सुरुवातीच्या दोन ओळी पूर्णा आजी स्वत: म्हणते, “चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?” या गाण्याच्या पुढच्या ओळी आहेत “निंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी” पण, नेमक्या याच ओळी बालपणापासून खरी तन्वी चुकीच्या म्हणत असते.

अर्थात सायली सुद्धा या ओळी तिच्याही नकळत चुकीच्या बोलते…ती डोळे बंद करून म्हणते, “निंबोणीचे झाड वरफांदी…मामाच्या वाड्यावर बंदी” तिच्या चुकीच्या ओळी ऐकून पूर्णा आजी म्हणते, “या दोन ओळींचे शब्द तू बालपणापासून असेच चुकीचे म्हणायचीस”

पूर्णा आजीचा हा खुलासा ऐकून अर्जुनसह कल्पना, प्रतिमा, रविराज या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सायलीला तन्वीच्या ओळी कशा काय माहिती? या विचाराने सगळे शॉक होतात. तर सायली मनातल्या मनात विचार करते, “आश्रमात मी सुद्धा याच दोन ओळी अशाच चुकीच्या म्हणायचे…हा एवढा योगायोग कसा काय असू शकतो?”

हे सगळं पाहून अर्जुनला चांगलाच धक्का बसतो. कारण, सायली तन्वी असू शकते ही शंका त्याच्या मनात यापूर्वी सुद्धा निर्माण झाली होती. आता सायलीच तन्वी असल्याचं सत्य केव्हा उघड होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.