Tharala Tar Mag : गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर ‘ठरलं तर मग’ मालिकेत पाहायला मिळणार आहे. एवढे वर्षे प्रिया सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही कुटुंबीयांसमोर खोटी तन्वी बनून वावरत असते. तिने पैशांसाठी प्रत्येकाचा विश्वासघात केलेला असतो. प्रियाची खरी ओळख असते बबली लोखंडे, अर्थात ती सदा-मैनाची मुलगी असते. हे सत्य आता सायली-अर्जुनने सर्वांसमोर उघड केलेलं आहे.
अर्जुनला अटक व्हावी, सायली एकटी पडावी यासाठी प्रियाने मोठा प्लॅन रचलेला असतो. पण, यावेळी सायली एकटी पडत नाही…तिला पाठिंबा देण्यासाठी तिच्या १३ मैत्रिणी मदतीचा हात पुढे करतात. अर्थात ‘स्टार प्रवाह’च्या १३ नायिका सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीच्या मदतीला आल्याचं पाहायला मिळत आहे. प्रियाचे सगळे डाव या १३ जणींमुळे फसतात.
प्रिया आपलं सत्य उघड होऊ नये यासाठी स्वत:च्या सख्ख्या आई-बाबांना म्हणजेच सदा-मैनाला सुद्धा विष देण्याचा प्रयत्न करते. पण, सायली आणि तिच्या मैत्रिणींच्या हुशारीमुळे प्रियाचा हा डावही फसणार आहे. आता सुभेदारांसमोर तिचं खरं रूप उघड झालेलं आहे. मात्र, प्रियाला या सगळ्या खोटारडेपणासाठी शिक्षा होणं गरजेचं आहे त्यामुळे सायली पुरावे शोधत असते.
प्रियाचं सत्य सर्वांसमोर आल्यावर सायली तिला चांगलाच चोप देणार आहे. कारण, सुरुवातीला प्रियाने खोटी तन्वी बनून किल्लेदारांच्या घरात एन्ट्री घेतली आणि त्यानंतर अश्विनबरोबर प्रेमाचं नाटक करून ती सुभेदारांच्या घरात आली. प्रिया आता नात्याने सायलीची धाकटी जाऊबाई आहे. पण, प्रियाने सर्वांचीच फसवणूक केलीये हे समोर येताच सायली तिला सर्वांसमोर कानाखाली मारते.
सायली तिला ठणकावून सांगते, “प्रिया या सगळ्यांच्या अश्रूंचा बदला मी घेणार! तुला इतकं मारणार…इतकं मारणार की…मारून-मारून तुला शिक्षा देणार. चल बाहेर हो…तुझ्या सगळ्या पापांची, छोट्या-मोठ्या सगळ्या गुन्ह्यांची तुला शिक्षा होणार! तू तन्वी नाहीयेस हे आता मी सर्वांना सांगणार…ते सुद्धा पुराव्यासकट…” शेवटी सायली प्रेक्षकांना म्हणते, “कुठेही जाऊ नका अजून हिशोब बाकीये…”
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या या नव्या प्रोमोमध्ये सायलीने प्रियाला चांगलाच चोप दिल्याचं पाहायला मिळत आहे. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “आता मजा येतेय…प्रियाचे तीन तेरा वाजलेत”, “एक नंबर कडक प्रोमो सायली २.०”, “एक नंबर सायली अजून मार तिला”, “सायली ऑन फायर”, “याला म्हणतात प्रोमो”, “सायली आमच्याकडूनही मार तिला..चला आता तरी सर्वांना खरं समजेल” अशा असंख्य प्रतिक्रिया या प्रोमोवर प्रेक्षकांकडून दिल्या जात आहेत.
दरम्यान, आता प्रियाचे हे सगळे कारनामे उघड झाल्यावर तिला पोलीस अटक करणार, की पुन्हा एकदा नाटक करून प्रिया स्वत:ची सुटका करून घेणार? हे ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.
