Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सायली आणि अर्जुन खरी तन्वी नेमकी कोण आहे? प्रियाचा भूतकाळ काय? या सगळ्या गोष्टींचा शोध घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रियाची ओळख तन्वी नसून ती सदा-मैनाची मुलगी बबली शिंदे असल्याचं सत्य आता अर्जुन-सायलीसमोर उघड झालेलं आहे. पण, मनातल्या सगळ्या शंका दूर करण्यासाठी ते DNA टेस्ट सुद्धा करणार आहेत. यासाठी सायली प्रतिमा आणि प्रियाच्या केसांचं सँपल घेते.
प्रियाला सायलीचा डाव वेळीच लक्षात येतो आणि ती सावध होते. नेहमीप्रमाणे डॉक्टरांनी DNA टेस्टचे रिपोर्ट्स बदलावे यासाठी प्रिया त्यांना पैशांचं आमिष दाखवते. पण, यावेळी अर्जुन सुद्धा अलर्ट मोडवर असतो. जर प्रिया सँपल बदलण्यासाठी गेली किंवा असं काही करण्याचा तिने प्रयत्न जरी केला तरी समजून जायचं की प्रिया खरी तन्वी नाहीये. अर्थात ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध होते.
अर्जुन-सायलीने आपली लबाडी बरोबर पकडलीये याची जाणीव प्रियाला होते आणि म्हणूनच आता ती मोठा डाव रचणार आहे. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू असते… “प्रसिद्ध वकिल अर्जुन सुभेदार आणि त्यांच्या पत्नीचा कार अपघातात मृत्यू!” अर्थात ही बातमी पाहून कल्पनासह सगळ्या सुभेदारांना धक्का बसतो. पण, दुसरीकडे प्रिया मात्र आनंदी असते. म्हणजेच हा अपघाताचा कट तिनेच रचलेला असतो.
खरंतर, अर्जुन-सायली सुखरुप असतात. त्यांना घरी आलेलं पाहताच सगळेच आनंदी होतात. पण, दुसरीकडे प्रियाच्या डोक्यात एक वेगळंच कारस्थान शिजत असतं. अर्जुनच्या गाडीत पोलिसांना एक डेड बॉडी सापडते. यामुळे आता अर्जुनला अटक करण्यात आली आहे. त्याला पोलीस ताब्यात घेणार आहेत. यावेळी सायली-प्रियाचा आमनासामना होणार आहे.
प्रिया म्हणते, “बिचारी सायली…आता तू एकटी काय करणार?” तिला वाटतं नवऱ्याच्या अटकेने सायली खचून जाईल…पण असं घडत नाही. सायली उलट उत्तर देत प्रियाच्या तोंडावर टिचक्या वाजवत म्हणते, “आता तुझे मी तीन तेरा वाजवणार!”
आता सायली जेलमधून आपल्या नवऱ्याला कसं सोडवणार? प्रियाला अडकवण्यासाठी तिच्याकडे नवा प्लॅन काय असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ‘ठरलं तर मग’च्या आगामी भागात पाहायला मिळतील.
