‘ठरलं तर मग’ मालिकेत नुकताच वटपौर्णिमा विशेष भाग पार पडला. एकीकडे अर्जुन-सायलीचं नातं बहरत असताना दुसरीकडे साक्षीने केलेल्या गंभीर आरोपांचा तणाव सुभेदार कुटुंबीयांवर कायम आहे. अर्जुन आणि चैतन्यवर साक्षी शिखरेने पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. या साक्षीने केलेल्या आरोपांवर आपली बाजू मांडण्यासाठी अर्जुन आणि चैतन्यला कोर्टाकडून मुदत दिलेली असते. या सगळ्या प्रकारामुळे महिपतची देखील जामिनीवर सुटका होते. एकंदर अर्जुनची या सगळ्या प्रकरणात प्रचंड चिडचिड होत असते.

अर्जुन आणि चैतन्यला चौकशीसाठी पॅनलसमोर बसवण्यात येतं. यावेळी साक्षीने केलेले आरोप खोटे आहेत हे तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत तर, पुढच्या गोष्टी कठीण आहेत अशी ताकीद या दोघांना दिली जाते. अर्जुन यावेळी तुम्ही सगळे निर्णय ठरवूनच आला आहात का? असा प्रतिप्रश्न या पॅनला विचारतो. चैतन्यच्या मनात यावेळी अपराधीपणाची भावना असते. साक्षीने आरोप केल्यापासून अर्जुन आपल्या चुकीमुळे या सगळ्यात अडकला असल्याचं चैतन्यला कायम वाटत असतं. त्यामुळे आता आपल्या जवळच्या मित्रासाठी तो मोठा त्याग करणार आहे.

हेही वाचा : या आठवड्यात OTT वर रिलीज झालेले चित्रपट अन् वेब सीरिजची यादी, आमिर खानच्या मुलाचा पहिला सिनेमा घरीच पाहता येणार

साक्षीनंतर आता येत्या भागात चैतन्य पत्रकार परिषद घेत असल्याचं पाहायला मिळणार आहे. यावेळी तो साक्षी शिखरे प्रकरणात अर्जुन सुभेदार यांचा काहीच संबंध नाही असं मीडियासमोर सांगतो आणि सगळे आरोप स्वत:च्या अंगावर घेतो. ही पत्रकार परिषद सुभेदार कुटुंबीय एकत्र पाहत असतात. चैतन्यने घेतलेला एवढा मोठा निर्णय ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. सायली-अर्जुनचे डोळे पाणावतात. यावेळी रविराज किल्लेदार सुद्धा सुभेदारांच्या घरी उपस्थित असतात. चैतन्यने घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे अर्जुन समोरच्या समस्या नाहीशा होऊन तो पुन्हा एकदा मधूभाऊंच्या केसमध्ये लक्ष घालू शकतो.

हेही वाचा : मुग्धाने केलं कीर्तन तर, तबल्याच्या साथीला प्रथमेश! लग्नाला ६ महिने पूर्ण होताच गायिकेने शेअर केला खास व्हिडीओ

आता अर्जुन चैतन्यला याबद्दल काय बोलणार आणि मालिकेत पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. अर्जुन-चैतन्यमध्ये असलेल्या खऱ्या मैत्रीचं दर्शन यानिमित्ताने मालिकेच्या लाखो चाहत्यांना होणार आहे. साक्षीला या दोघांना कोंडीत पकडायचं असतं. परंतु, चैतन्यच्या कबुलीमुळे तिचाही प्लॅन मोडून पडणार आहे. आता अर्जुन… महिपत आणि साक्षीचा हा खोटेपणा कोर्टासमोर कसा उघड करणार आणि मधुभाऊंची केव्हा सुटका होणार? या गोष्टी पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात आतुरता निर्माण झाली आहे.