Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली साडेतीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. रंजक कथानक, उत्तम स्टारकास्ट, मालिकेत सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका कायम आघाडीवर असते. सायली, कल्पना, अर्जुन, प्रतिमा, प्रिया, रविराज, महिपत ही मालिकेतील सगळीच पात्रं आता घराघरांत लोकप्रिय झाली आहेत. या कलाकारांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग सुद्धा तेवढंच घट्ट आहे. याबद्दल जुई गडकरीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर सगळ्या महिला कलाकारांचा एक ग्रुप तयार झाला आहे. या सगळ्या कलाकारांनी एकत्र मिळून मोनिका दबाडेचं डोहाळेजेवण सुद्धा सेटवर केलं होतं. यावरून या सगळ्यांची मैत्री किती खास आहे याचा अंदाज येतो.
सेटवर ‘या’ खोलीत बसून गप्पागोष्टी होतात…
अभिनेत्री जुई गडकरी याबाबत ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “ठरलं तर मग’मध्ये आम्हा सगळ्या मुलींची टीम आहे. आमच्या शोमध्ये मुली जास्त आहेत आणि आम्ही सगळ्याजणी फार घट्ट मैत्रिणी आहोत. आमच्या सेटवरचे पुरुष एक पॉइंटला आम्हाला कंटाळतात की, अरे यांना आता शांत बसवा. आमचा धुडगूस सुरू असतो, आम्ही प्रचंड गप्पा मारतो. आम्ही सगळ्याजणी सेटवरची जी आमची ‘स्टडी रूम’ आहे तिथे बसून असतो. सगळ्या जणी रेडी होऊन स्टडी रूममध्ये जातो आणि सीन कट झाल्यावरही आम्ही सगळ्याजणी तिथेच जमतो.”
“तिथे आमच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरू असतात. तू नवीन काय घेतलंस, मग शॉपिंग काय करायची, मोनिकाच्या बाळाचा विषय निघतो, कुणाच्या घरचा विषय निघतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सेटवरच्या सगळ्या मुली एकमेकींच्या चिअरलीडर आहेत.”
आम्ही एकत्र फिरायला जाणार…
“आम्ही सगळ्याजणी एकमेकींना खूप मदत करतो. सेटवर जर कुणी एखाद्या दिवशी Low Feel करत असेल तरीही आम्ही सगळे त्या व्यक्तीला पाठिंबा देतो. आता सेटवर आमची जी मुलींची टीम आहे त्यापैकी आम्ही चार जणी आता लवकरच एकत्र फिरायला सुद्धा जाणार आहोत. आमची छान गट्टी जमलीये आणि आमचं सतत काही ना काही सुरू असतं.” असं जुईने सांगितलं.
दरम्यान, सायली-प्रिया सुद्धा ऑफस्क्रीन खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर या दोघींनी एकत्र एन्ट्री घेतली होती. यांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग पाहून सगळेच थक्क झाले होते. प्रियांका ( प्रिया ) वयाने लहान असली तरीही प्रचंड समजूतदार मुलगी आहे असंही यावेळी जुईने सांगितलं होतं.
