Tharala Tar Mag 5th Jan Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीने सुमन काकूला नागराजवर चोवीस तास लक्ष ठेवायला सांगितलं आहे. नागराज दिवसभर काय-काय करतो, त्याला कोणाचे फोन येतात, त्याचा आणि महिपतचा काही संबंध आहे का याकडे सध्या सुमन व्यवस्थित लक्ष देतेय. यापूर्वी सुमनने अनेकदा नागराजला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण, दरवेळी नागराज काही ना काही मार्ग काढून आपल्या बायकोला वेडं बनवतो. पण, आता तसं होणार नाहीये. ‘ठरलं तर मग’ मालिकेतमध्ये मोठा ट्विस्ट येणार असून आता नागराज अन् महिपतला सुमन एकत्र पाहणार आहे.

प्रतिमा व रविराज किल्लेदार यांच्या २२ वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामागे महिपतचा हात असल्याचं आता सर्वांना कळून चुकलं आहे. मात्र, हा अपघात घडवण्यासाठी महिपतला आपल्या नवऱ्याने देखील साथ दिलीये अशी सुमनला शंका असते. ती याबाबत सायली आणि अर्जुनला कल्पना देते. पण, ठोस पुरावा नसल्याने अर्जुन कोणतंही पाऊल उचलत नाही. यामुळेच सायली सुमन काकूला तुम्ही कायम नागराज काकांवर लक्ष ठेवा असा सल्ला देते. कारण, महिपतला शोधण्यासाठी नागराजवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे याची जाणीवर अर्जुन-सायलीला असते.

आता सुमन नागराजचा पाठलाग करणार आहे. नागराजने गेले अनेक दिवस महिपतला किडनॅप करून आपल्या ताब्यात ठेवलेलं असतं. नेहमीप्रमाणे नागराज घराबाहेर पडतो आणि महिपतला भेटण्यासाठी त्याच्या अड्ड्यावर पोहोचतो इथेच एक मोठा ट्विस्ट येणार आहे.

नागराज आणि महिपतला सुमन काकू एकत्र पाहते. ती लगेच सायलीला फोन करते. पण, घरात सेलिब्रेशन सुरू असल्याने सायली सुरुवातीला कॉल उचलत नाही. शेवटी काही वेळाने सायली सुमनचा फोन उचलते आणि तिची विचारपूस करते. सुमन घाबरत तिला सगळ्या परिस्थितीची माहिती देत असते पण सुमनचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचत नाही.

आता सुमन सायलीला पूर्ण माहिती देऊ शकेल का? की त्याआधीच सुमनला फोनवर बोलताना नागराज पाहणार? असे बरेच प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात हा प्रोमो पाहून निर्माण झाले आहेत. हा विशेष भाग ५ जानेवारीला प्रसारित केला जाईल.

आता ‘ठरलं तर मग’ मालिकेत नव्या वर्षात नेमका काय खुलासा होणार? या सगळ्या गोष्टी सुमनच्या जीवावर बेतणार का? की सुमन काकू सायलीला सगळी माहिती पुरवण्यात यशस्वी होईल? याचा उलगडा लवकरच होईल. दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ही टीआरपी टॉपर मालिका रोज रात्री ८:३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाते.