Marathi Serial TRP Updates : टीआरपीच्या आकडेवारीत दर आठवड्यात कोणती मालिका बाजी मारणार, टॉप-५ मध्ये कोणत्या मालिका असणार हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. गेल्या ३ वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ मालिका बाजी मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात स्टार प्रवाहवर ‘ठरलं तर मग’ आणि ‘नशीबवान’ या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळाला होता. गेल्या आठवड्याच्या टीआरपीमध्ये ५.३ रेटिंगसह ‘ठरलं तर मग’ मालिका पहिल्या स्थानी आहे आणि आदिनाथ कोठारेची ‘नशीबवान’ मालिका ४.८ रेटिंगसह दुसऱ्या स्थानी आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकाचा अंतिम भाग १२ डिसेंबरला प्रदर्शित झाला. या मालिकेचा क्लोझिंग टीआरपी ४.७ आहे. ही मालिका तिसऱ्या स्थानी असून अंतिम आठवड्यांमध्ये या सिरियलला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. गेले काही आठवडे टीआरपीमध्ये दुसऱ्या स्थानी असलेली अर्णव-ईश्वरीची ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका आता ४.४ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे.
‘झी मराठी’च्या ‘कमळी’ मालिकेने ४.१ रेटिंगसह टीआरपीच्या यादीत टॉप-५ मध्ये एन्ट्री घेतली आहे. याशिवाय ‘झी मराठी’वर ही मालिका नंबर वन ठरली आहे.
सहाव्या स्थानी ३.८ रेटिंगसह रेश्मा शिंदेची ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आहे. तर तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेला गेल्या आठवड्यात ३.७ रेटिंग मिळालं आहे. या दोन्ही मालिकांमध्ये सध्या स्लॉट लीडर होण्यासाठी चुरस रंगली आहे. पण, आता लवकरच ‘स्टार प्रवाह’वर साडेसातच्या स्लॉटला ५ जानेवारीपासून ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मराठी मालिकांचा टीआरपी
१. ठरलं तर मग – ५.३
२. नशीबवान – ४.८
३. लक्ष्मीच्या पाऊलांनी – ४.७
४. तू ही रे माझा मितवा – ४.४
५. कमळी – ४.१
६. घरोघरी मातीच्या चुली – ३.८
७. वीण दोघांतली ही तुटेना – ३.७
८. लग्नानंतर होईलच प्रेम, तारिणी, लक्ष्मी निवास – ३.५
९. येड लागलं प्रेमाचं – ३.३
१०. देवमाणूस – ३.१
‘तारिणी’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘लक्ष्मी निवास’ या मालिकांचा टीआरपी समान आहे. तसेच गेल्या काही दिवसांत विशाल निकमच्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेच्या टीआरपीत बरीच घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर ‘देवमाणूस’ मालिकेचा टीआरपी गेल्या आठवड्यात जैसे थे आहे.
दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ने काही दिवसांपूर्वीच आणखी २ नव्या मालिकांची घोषणा केली आहे. तर ‘झी मराठी’वर सुद्धा वल्लरी विराज ‘शुभ श्रावणी’ या मालिकेच्या माध्यमातून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या नव्या मालिका ऑन एअर झाल्यावर टीआरपीत काय बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
