Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेली साडेतीन वर्षे ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या प्रवासात मालिकेत अनेक नवनवीन कलाकार आले. तर, आता काही जुने कलाकार या मालिकेतून निरोप घेणार आहेत. साक्षी शिखरेची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री केतकी पालव लवकरच या मालिकेतून एक्झिट घेणार आहे. त्यामुळे केतकीची रिप्लेसमेंट म्हणून साक्षी शिखरेची भूमिका कोण साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

‘ठरलं तर मग’ मालिका सुरू झाल्यावर सुरुवातीला ही भूमिका अभिनेत्री मीरा जगन्नाथ साकारत होती. त्यानंतर मालिकेत केतकीची एन्ट्री झाली. गेली तीन वर्षे केतकीने साक्षीची भूमिका प्रचंड गाजवली पण, आता लवकरच तिच्या जागी एका नव्या अभिनेत्रीची वर्णी लागणार आहे. तिने स्वत: याबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला होता. केतकी सध्या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे.

याशिवाय मालिकेतून आणखी एका अभिनेत्याची एक्झिट झालेली आहे. नागराज किल्लेदारच्या मुलाची म्हणजेच राकेश किल्लेदारची भूमिका यापूर्वी अभिनेता अपूर्व रांजणकर साकारत होता. मात्र, गेल्या वर्षभरात राकेश हे पात्र मालिकेत दिसलेलं नाहीये. आता नागराज जेलमध्ये गेल्यावर राकेशची मालिकेत पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे.

राकेश किल्लेदारची भूमिका आता लोकप्रिय अभिनेता सुप्रीत कदम साकारणार आहे. सुप्रीतने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ‘सावळ्याची जणू सावली’, ‘नकळत सारे घडले’, ‘लग्नाची बेडी’, ‘काव्यांजली’ या लोकप्रिय मालिकांमध्ये सुप्रीत झळकला आहे. आता तो राकेश किल्लेदारच्या रुपात प्रेक्षकांचं मनोरंज करण्यासाठी सज्ज झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राकेश सायली-अर्जुनवर गुपचूप लक्ष ठेवत असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय त्याने मधुभाऊंनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण, त्याची ओळख इतके दिवस गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. आता इथून पुढे मालिकेत सुप्रीत कदम राकेश किल्लेदारची भूमिका साकारणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. अभिनेत्याने स्वत: याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर ८:३० वाजता प्रसारित केली जाते. आता अपूर्वच्या जागी मालिकेत सुप्रीतची वर्णी लागलीये. पण, साक्षी शिखरेचं पात्र कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.