Tharala Tar Mag Upcoming Twist : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील प्रियाचा खरा चेहरा उघड करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीच्या १३ नायिका एकत्र आल्या आहेत. या सगळ्याजणी मिळून प्रियाचं खरं रूप सर्वांसमोर उघड करणार आहेत. आता प्रियाचा खोटेपणा सुभेदार कुटुंबीयांसमोर उघड झाल्यावर मालिका संपणार का? मालिका संपणार नसेल तर पुढे काय घडणार? असे बरेच प्रश्न सध्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अभिनेत्री जुई गडकरीने अल्ट्रा बझ मराठीशी संवाद साधताना दिली.

“प्रेक्षक ३ वर्षे वाट पाहत आहेत…आता तरी प्रियाचं सत्य समोर येणार आहे का?” या प्रश्नावर सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली, “आता काहीच ट्विस्ट नाहीये…प्रियाचं सत्य समोर आणण्यासाठीच आम्ही १३ जणी म्हणजेच १३ नायिका एकत्र आहोत. त्यामुळे नक्कीच प्रियाचं सत्य बाहेर येणार आहे…आमच्या सुभेदारांच्या घरातही सर्वांना समजणार आहे की, प्रिया काय आहे…तिने आजवर काय-काय केलंय. आता मी सांगू शकते The Wait Is Over!”

“सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रियाचं सत्य समोर आल्यावर आता मालिका संपणार नाहीये….अजून महत्त्वाता टप्पा बाकी आहे, असं काहीच नाहीये.” हे सुद्धा जुईने स्पष्ट केलं आहे.

मालिकेत पुढे काय घडणार याबद्दल सांगताना जुई म्हणाली, “ठरलं तर मग’ मालिका संपणार नाहीये कारण प्रियाचं सत्य जरी बाहेर आलं असलं तरी मी तन्वी आहे…हे अजून कोणालाच समजलेलं नाहीये. त्यामुळे मालिका संपत नाहीये. गेल्यावेळी मी सांगितलं होतं…जसं मधुभाऊ निर्दोष आहेत, हा आमच्या मालिकेचा एक टप्पा होता, तसाच प्रियाचं सत्य हा दुसरा टप्पा आहे. यामध्ये तुम्हाला प्रियाचं खरं रुप पाहायला मिळेल. मात्र, सायली तन्वी आहे हा खूप महत्त्वाचा भाग आहे…तो यानंतर येईल. आता फक्त प्रियाचा खोटेपणा तुमच्यासमोर उघड होईल.”

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या ४५ मिनिटं प्रसारित केली जाते. गेली साडेतीन वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर उघड होणं…हा मालिकेतील खूप महत्त्वाचा टप्पा आहे, आता यात अर्जुन-सायली कसे यशस्वी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.