Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता सायली-अर्जुनने ‘मिशन तन्वी’ सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. नागराजने तुरुंगात जाताना हिंट दिल्यामुळे आता दोघंही मिळून खरी तन्वी नक्की प्रियाच आहे का? याचा शोध घेणार आहेत. या सगळ्याचा शोध घेताना अर्जुन-सायलीच्या हाती मोठा पुरावा लागणार आहे. हा पुरावा नेमका काय आहे? आणि मालिकेत आता कोणता ट्विस्ट येणार पाहुयात…

‘ठरलं तर मग’ मालिकेत सुभेदारांच्या घरी होळीचा उत्सव रंगणार आहे. होळीच्या सणाला घराघरांत पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. यानुसार, सुभेदारांच्या घरी सुद्धा पुरणपोळ्यांचा बेत केला जातो. अन्नपूर्णा आजी जेव्हा पुरणपोळीचा पहिला घास खाते…तेव्हाच ही चव अगदी प्रतिमा पुरणपोळ्या करते तशीच आहे असं आजी म्हणते. इतकंच नव्हे तर नक्की या पोळ्या प्रियाने केल्यात का? याबद्दल ती कल्पना आणि सायलीकडे पुन्हा चौकशी करते. इतक्यात प्रिया येते आणि म्हणते, “हो! चव सेम असणारच ना…शेवटी आमचं रक्ताचं नातं आहे”

यानंतर काही वेळाने सगळेजण मिळून होळीची पूजा करतात. पण, सगळीकडे आनंदाचं वातावरण असताना पुन्हा एकदा प्रतिमाची प्रकृती बिघडणार आहे. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं जातं आणि यानंतर तिला गरज भासते रक्ताची.

आता सगळ्यांसमोर प्रिया प्रतिमाला रक्त देण्यास नकार देते. प्रिया स्वत:च्या जन्मदात्या आईला रक्त देण्यास नकार का देतेय? याबद्दल सायलीला संशय येतो आणि इथूनच अर्जुन-सायलीच्या ‘मिशन तन्वी’ शोधकार्याला नवीन दिशा मिळणार आहे.

आता प्रियाची रक्तगट तपासणी करणं आवश्यक आहे याची जाणीव अर्जुनला होते. सुभेदारांच्या घरी रंगपंचमीच्या दिवशी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला जाईल असं मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. या कॅम्पदरम्यान अर्जुन मोठ्या हुशारीने प्रियाचं ब्लड सँपल मिळवतो. पण, या सगळ्यात ती नक्कीच काहीतरी घोळ घालणार याची त्याला १०१ टक्के खात्री असते.

अर्जुनच्या संशयानुसार खरंच प्रिया रक्ताचे रिपोर्ट्स बदलण्यासाठी फोन करते. पण, यावेळी रितसर प्लॅन केल्यामुळे अर्जुन-सायलीला प्रियाचा डाव वेळीच लक्षात येतो आणि ते सावध होता. आता या दोघांच्या हाती प्रिया विरोधात सर्वात मोठा लागणार आहे हा पुरावा म्हणजे रक्तगट तपासणीचे रिपोर्ट्स.

आता प्रियाचे खरे रिपोर्ट्स अर्जुनच्या हाती लागणार की खोटे? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. याशिवाय काही नेटकऱ्यांनी कमेंट्सध्ये प्रियाचे खरे रिपोर्ट्स यांना सापडणार नाहीत…उलट ती गरोदर वगैरे आहे असा अजब पुरावा सापडेल, असाही अंदाज व्यक्त केला आहे.

आता प्रिया-प्रतिमाचा ब्लड ग्रुप मॅच होत नाहीये हे सत्य सायली-अर्जुनला खरंच समजणार का? की मालिकेत वेगळाच ट्विस्ट येणार हे या आठवड्यात स्पष्ट होईल. दरम्यान, सध्या ‘ठरलं तर मग’ मालिका सोमवार ते शुक्रवार ८:४५ ते ९:३० आणि शनिवार-रविवार ८:३० ते ९:०० या नेहमीच्या वेळेत प्रसारित केली जाईल.