Tharala Tar Mag Dialogue Writer Shilpa Navalkar : ‘ठरलं तर मग’ मालिका जवळपास चार वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेच्या यशाचं श्रेय जेवढं मुख्य कलाकारांचं आहे, तेवढंच याचं क्रेडिट पडद्यामागे काम करणारे दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ आणि लेखकांचं सुद्धा आहे. ‘ठरलं तर मग’ची संवाद लेखिका स्वत: या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. मालिकेचे १२०० भाग पूर्ण होताच या अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर केली आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रतिमा आत्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिल्पा नवलकर या मालिकेच्या संवाद लेखिका सुद्धा आहेत. नुकतेच या मालिकेचे १२०० भाग पूर्ण झाले. मालिका आता १३०० एपिसोडच्या उंबरठ्यावर असताना टीमने खास सेलिब्रेशन केलं आहे. या कार्यक्रमातील खास फोटो प्रतिमा आत्याने इन्टाग्रामवर शेअर केले आहेत.

‘ठरलं तर मग’च्या कलाकारांचा तसेच पडद्यामागे काम करणाऱ्या तंत्रज्ञांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही ट्रॉफी खूपच सुंदर आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या थीमनुसार ट्रॉफीच्या अगदी वरच्या बाजूला हातमिळवणी करतानाचा Symbol दाखवण्यात आला आहे, आणि त्याखाली १२०० भागांबद्दल टीमचं कौतुक करण्यात आलं आहे.

शिल्पा नवलकर लिहितात, “खूप मेहनत आणि प्रेक्षकांचं अपार प्रेम, याचं हे फळ…१२०० नॉट आऊट आणि १३०० भागांच्या उंबरठ्यावर…गेली साडेतीन वर्षं ‘ठरलं तर मग’ला महाराष्ट्राची नंबर १ मालिका केल्याबद्दल प्रेक्षकांचे मनापासून आभार!”

शिल्पा नवलकर यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर कलाकारांनी देखील खास कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री ऋजुता देशमुख लिहिते, “वॉव ट्रॉफी सुंदर आहे…मस्त मस्त” तर, सुकन्या मोने यांनी या पोस्टवर, “क्या बात है! मन:पूर्वक अभिनंदन” म्हणत शिल्पा यांचं कौतुक केलं आहे.