Tharla Tar Mag Promo 23rd Sep : ‘ठरलं तर मग’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच अर्जुनवर जीवघेणा हल्ला झाल्याचा सीक्वेन्स पाहायला मिळाला. या हल्ल्यातून अर्जुन थोडक्यात बचावतो, यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं जातं. आता अर्जुनच हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे सायलीला निर्दोष मुक्त कोण करणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो. पण, यादरम्यान गरोदर असलेली सायली तेवढ्याच जिद्दीने सगळ्या प्रकरणांचा शोधू घेऊ लागते, महिपत विरोधात पुरावे शोधते. याशिवाय ती स्वत:ची केस स्वत: लढण्याचा निर्णय घेते.

सायलीला या प्रवासात अर्जुन जमेल तशी मदत करत असतो. अर्जुन सायलीवर राहत्या घरातच पुन्हा एकदा हल्ला केला जातो. यावेळी देखील अर्जुनच्या सावधपणामुळे मोठा अनर्थ टळतो. अर्जुन पुन्हा घरी आला असला तरी, तो दिवसभर व्हिलचेअरवर बसून असतो. त्याच्या प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा झालेली नाहीये. त्यामुळे आपल्या नवऱ्याला पुन्हा एकदा आधीसारखं ठणठणीत बरं करायचं असा निर्धार सायलीने केलेला आहे.

घरात बाप्पाचं आगमन झाल्यावर सायली देवासमोर हात जोडून प्रार्थना करते की, “बाप्पा हे पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभे राहूदेत” यानंतर सायली जाणूनबुजून तिचा साडीचा पदर पेटत्या दिव्याकडे नेते आणि यामुळे तिचा पदर जळतो, आग लागते. घराच्या दरवाजात व्हिलचेअरवर बसलेल्या अर्जुनला सायलीचा पदर जळत असल्याचं दृश्य दिसतं आणि तो जोरात ‘बायको….’ ओरडून तिला आवाज देण्याचा प्रयत्न करतो.

सायलीपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये…या विचाराने धडपड करून अर्जुन व्हिलचेअरवरून उठतो. तो स्वत:ला कसाबसा सावरत सायलीपर्यंत येऊन पोहोचतो आणि ही आग विझवतो. सायलीवर अर्जुन भयंकर चिडतो पण, नवऱ्याला पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभं राहिलेलं पाहून सायली मात्र खूप आनंदी होते. मुलाला पाहून कल्पना देखील खूश होते.

सायलीचा प्रयत्न अखेर सफल ठरला आहे. अर्जुन स्वत:च्या पायावर पुन्हा उभा राहिल्यामुळे सायलीला मोठा दिलासा मिळाला आहे. आता पुन्हा एकदा तो केसची सूत्र हाती घेईल आणि सर्वांना धडा शिकवेल याची खात्री सायलीला असते.

‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा प्रोमो पाहून अर्जुनचे चाहते आणि मालिकेचे प्रेक्षकही भावुक झाले आहेत. हा विशेष भाग २३ सप्टेंबरला रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल.