‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् अश्विनची जोडी चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या दोघांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग सुद्धा तेवढंच खास आहे. या भूमिका अनुक्रमे चैतन्य सरदेशपांडे ( चैतन्य ) आणि प्रतिक सुरेश ( अश्विन ) यांनी साकारल्या आहेत. या दोघांनी नुकताच मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास केला. या प्रवासादरम्यान आलेला सुंदर अनुभव अभिनेत्याने खास पोस्ट शेअर करत सर्वांना सांगितला आहे.
मुंबई लोकलमध्ये दैनंदिन प्रवास करणारे मुंबईकर मोठ्या उत्साहात प्रत्येक सणवार साजरे करतात. भजन, केळवण, रक्षाबंधन, दिवाळी ते अगदी दहीहंडीपर्यंतचे सगळे सण लोकलच्या डब्यात तितक्याच उत्साहाने साजरे केले जातात. लोकल ट्रेनमधील दहीहंडी उत्सवाचा खास क्षण नुकताच चैतन्य आणि प्रतिक यांनी अनुभवला. याचा खास अनुभव त्यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सर्वांना सांगितला आहे.
चैतन्य आपल्या पोस्टमध्ये लिहितो, “आपण सण साजरे करतो…यापेक्षाही आपण आपले सण कसे साजरे करतो हे महत्त्वाचं आहे. आज मला याचा सुंदर अनुभव आला. मला या प्रवासात भेटलेले सगळेच लोक खूप छान होते. आम्ही दोघं कोण आहोत, कोणती भाषा बोलतो, कोणत्या समाजाचे किंवा धर्माचे आहोत याबद्दल त्यांनी काही विचारलं नाही आणि मुळात त्यांना याची पर्वाच नव्हती. या सगळ्यांनी अगदी सहजतेने आम्हा दोघांनाही त्यांच्यात समावून घेतलं. कोणतेही प्रश्न विचारले नाहीत…अगदी आमची नावंही विचारली नाहीत. हळुहळू आमचा संपूर्ण डबाच दहीहंडी उत्सवाचा एक भाग झाला. सगळे या उत्सवात सहभागी झाले, गाण्यांची मैफल रंगली. काही क्षणांसाठी, अनोळखी लोक अनोळखी वाटलेच नाहीत.”
चैतन्य पुढे लिहितो, “मग, एका स्थानकावर आमचं गाणी गाणं अचानक थांबलं…मी त्या काकांना विचारलं, “आपण अचानक का थांबलो?” ते म्हणाले, “आपला डबा प्लॅटफॉर्मवरील पोलीस चौकीच्या अगदी समोर थांबला आहे.” मी विचारलं, “आपण काही बेकायदेशीर कृत्य करत नाही आहोत ना? आपण खूप मोठा आवाजही करत नाहीये, कोणाला त्रासही देत नाही आहोत, डब्याचे दरवाजे अडवत नाही आहोत आणि कसलेही स्टंट्सही करत नाही आहोत.” यावर ते काका हसले आणि म्हणाले, “नाही, आपण कायद्याच्या विरोधात काहीही करत नाही आहोत. पण हे पोलीस अधिकारी त्यांचे कर्तव्य बजावत आहेत….आणि आपण त्यांचा आदर केला पाहिजे.”
“काकांचं ते वाक्य माझ्या मनात रुतून बसलंय. कारण मला हेच अपेक्षित आहे…असा भारत जिथे आपण दुसऱ्याला कोणताही त्रास न देता आपली संस्कृती साजरी करतो. जिथे लोक कुठून आले आहेत हे न विचारता आपण त्यांना सामावून घेतो. जिथे भाषा, धर्म यामुळे कोणताही अडथळा निर्माण होत नाही. जिथे उत्सवासह जबाबदारीची जाणीव असते. जिथे परंपरेसह माणुसकी असते. जिथे स्वातंत्र्यासह इतरांचा विचार करण्याची वृत्ती असते. कदाचित ट्रेनमध्ये गाणी गाणं ही संस्कृती नसेल. पण ज्या पद्धतीने त्या लोकांनी तो आनंद साजरा केला, ती नक्कीच संस्कृती होती. मला असाच भारत पाहायचा आहे. आणि अशाच भारताचा मला अभिमान वाटतो.” अशी पोस्ट चैतन्यने लिहिली आहे.
अभिनेत्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी सुद्धा कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच चैतन्यने लिहिलेल्या सुंदर कॅप्शनचंही चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
