स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तसंच या मालिकेतील अर्जुनच्या पात्राने चाहत्यांना भुरळ घातली आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर असून अर्जुनचं पात्र साकारणाऱ्या अमित भानुशालीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय.

काल १६ जून रोजी जगभरात ‘फादर्स डे’ साजरा केला गेला. मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या वडिलांबरोबरचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच नुकत्याच बाबा झालेल्या काही कलाकारांनी आपल्या चिमुकल्यांबरोबरच्या खास आठवणी शेअर केल्या.

हेही वाचा… ऐश्वर्या नारकर यांनी ‘फादर्स डे’च्या निमित्ताने शेअर केला आई-वडिलांचा खास व्हिडीओ, म्हणाल्या, “बाबांची पल्लू…”

अर्जुन ऊर्फ अमितने वैयक्तिक आयुष्यात श्रद्धाबरोबर लग्न केलंय. दोघांना हृदान नावाचा लहान मुलगा आहे. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने श्रद्धाने सोशल मीडियावर अमितचे त्याच्या लेकाबरोबर फोटो शेअर केले. नुकत्याच जन्मलेल्या हृदानने अमितचं बोट पकडलं आहे, असा पहिला फोटो आहे. दुसऱ्या फोटोत अमित चिमुकल्या हृदानला मिठी मारताना दिसतो आहे. नंतरच्या काही फोटोंमध्ये बाप-लेकाचे सुंदर फोटो श्रद्धाने शेअर केले आहेत, यात हृदान मोठा होतानाचा प्रवासच जणू दाखवला आहे.

या फोटोला कॅप्शन देत श्रद्धाने लिहिलं, “फादर्स डेच्या शुभेच्छा पप्पा. माझ्या आयुष्यात असल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुम्ही आसपास असता तेव्हा आयुष्य खूप सुंदर असते, आय लव्ह यू पप्पा.”

हेही वाचा… “फ्लावर नही फायर है…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी आणि ऋषिकेशचा ‘पुष्पा-२’च्या गाण्यावर हटके डान्स, चाहते म्हणाले…

याबरोबरच हृदानने अमितला ‘फादर्स डे’साठी एक खास सरप्राईजदेखील दिलं. हृदान आणि त्याच्या आईने मिळून अमितसाठी खास केक आणला होता. छोट्या हृदानने बाबाला केक भरवत हा खास दिवस साजरा केला.

हेही वाचा… VIDEO: “वहिनी म्हणतील…”, रितेश देशमुख आणि जिनिलीयाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले…

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. साक्षीला चैतन्यचं सत्य कळल्यामुळे ती पत्रकार परिषद बोलवून चैतन्य आणि अर्जुनवर आरोप लावते. यामुळे अर्जुनच्या ऑफिसवर हल्ला होतो. आता मालिकेत पुढे काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

या मालिकेत अमित भानुशाली अर्जुन सुभेदार ही प्रमुख भूमिका साकारत आहे, तर त्याचबरोबर जुई गडकरी सायलीच्या प्रमुख भूमिकेत झळकतेय. या मालिकेत प्रियांका तेंडोलकर, ज्योती चांदेकर, प्राजक्ता दिघे, चैतन्य सरदेशपांडे, केतकी पालव या कलाकारांच्यादेखील निर्णायक भूमिका आहेत.