Tharla Tar Mag Fame Monika Dabade : ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार घराघरांत लोकप्रिय आहेत. मालिकेत अस्मिताची म्हणजेच अर्जुनच्या सख्ख्या बहिणीची भूमिका अभिनेत्री मोनिका दबाडे साकारत आहे. वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीने मार्च महिन्यात गोंडस अशा मुलीला जन्म दिला. यामुळेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने या मालिकेतून ब्रेक घेतला. आता अभिनेत्रीने लाडक्या लेकीचं बारसं घरगुती पद्धतीने केलं आहे.
मार्च महिन्यात मोनिकाच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. मोनिकाने गोंडस अशा मुलीला १५ मार्च २०२५ रोजी जन्म दिला. आता अभिनेत्रीने लेकीचं बारसं केलं आहे. मोनिकाने तिच्या चिमुकलीचं नाव वृंदा असं ठेवलं आहे.
मोनिका लेकीच्या बारशाचे फोटो शेअर करत लिहिते, “आमची ‘वृंदा’ म्हणजे पवित्र तुळस… तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव असूद्या” मोनिकाने लेकीचं नाव जाहीर करताच संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने, “खूप गोड नाव… प्रेम आणि आशीर्वाद” अशी कमेंट मोनिकाच्या पोस्टवर केली आहे. याशिवाय सुकन्या मोने, जुई गडकरी, शर्वगी जोग, अभिजीत खांडकेकर, केतकी पालव अशा सगळ्याच कलाकारांनी मोनिका व तिच्या चिमुकलीवर कमेंट्समध्ये भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, आता मोनिका लेकीच्या जन्मानंतर ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर पुन्हा केव्हा कमबॅक करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सगळेच प्रेक्षक तिची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मोनिकाचा नवरा काय करतो?
मोनिकाचा पती चिन्मय कुलकर्णीचं छोट्या पडद्याशी खास कनेक्शन आहे. टेलिव्हिजनवरच्या रिॲलिटी शोजचा स्टार लेखक म्हणून त्याला ओळखलं जातं. सध्या एका Stand Up कॉमेडी शोमध्ये तो सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव’, ‘स्टार प्रवाह ढिंच्यॅक दिवाळी २०२३’, ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमांचं लिखाण चिन्मय कुलकर्णीने केलेलं आहे. यासाठी वाहिनीने त्याचा सन्मान देखील केला होता.