Priyanaka Tendolkar New Home : आपल्या हक्काचं घर असावं असं अनेकांना वाटतं. अनेक वर्षे मेहनत केल्यानंतर लोक त्यांचं स्वत:चं घर खरेदी करतात, त्यामुळे त्या घराशी त्यांच्या भावना जोडलेल्या असतात. काही दिवसांपूर्वी मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचंही स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं. ही अभिनेत्री म्हणजे प्रियांका तेंडोलकर.

प्रियांका तेंडोलकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘झी युवा’वरील ‘फुलपाखरू’ मालिकेतून ती घराघरांत पोहोचली. पण, ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’मधून तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. अनेक वर्षे इंडस्ट्रीत काम केल्यानंतर प्रियांकाने काही महिन्यांपूर्वीच मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं. या घरात ती तिच्या आई-वडिलांबरोबर राहते.

नवीन घराबद्दल प्रियांका तेंडोलकरची प्रतिक्रिया

‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना तिने तिच्या या घराबद्दल सांगितलेलं. अभिनेत्री नवीन घराबद्दल म्हणालेली, “मी खूप डोकं लावून आणि खर्च कसा कमी होईल हा विचार करून इंटिरिअर केलं आहे. खूप लोकांना वाटतं की इंटिरिअर महाग आहे, पण तसं नसतं. नीट डोकं लावून केलं तर सगळं होतं.” नवीन घरात तिनं सर्व अरेंजमेंट वास्तुशास्त्रानुसार केल्याचं म्हटलं आहे.

अभिनेत्री म्हणालेली, “माझी आई बऱ्यापैकी वास्तुशास्त्र वगैरेवर विश्वास ठेवते, तिच्यामुळे माझाही आहे, त्याचा फायदाच झाला आहे; त्यामुळे बऱ्याच गोष्टी वास्तुनुसार केल्या आहेत. म्हणजे देव्हारा इथे असायला हवा, तर तो त्यानुसार तिथे ठेवला आहे. मनी प्लँटही त्यानुसारच.” प्रियांकाने पुढे सांगितलं की, तिच्या घरामधील किचन आणि तिच्या बेडरूममधील आरसा या अशा सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार केल्याचं म्हटलं आहे.

प्रियाकाच्या घरामध्ये लाकडी फर्निचरचा अधिक प्रमाणात वापर करण्यात आला असून तिच्या हॉलमध्ये सुंदर असं रंगबेरंगी मोठं पेंटिंगही आहे, जे पांढऱ्या शुभ्र रंगाच्या भिंतींवर उठून दिसतं. यासह तिच्या घरात सुंदर असा देव्हाराही आहे, जे तिच्यासाठी खूप खास आहे; कारण तिने तिच्या जुन्या घरातून नवीन घरात येताना फक्त देव्हारा सोबत घेतल्याचं सांगितलं, ज्याला तिने नंतर अजून डेकोरेट करून सजवलं आहे. यासह तिच्या खोलीतही तिचे लहनपणीचे वेगवेगळे अनेक फोटो असून ते तिने भिंतीवर फ्रेम केले आहेत. प्रियांकाच्या २ बीएचकेच्या घरात स्वयंपाकघर, दोन बेडरूम आणि तीन बाल्कनी आहेत, ज्या तिने स्वत: सजवल्या आहेत.