‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीचं अव्वल स्थान गाठून आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील महामालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या मालिकेतील कलाकारही तितकेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. मग ती अर्जुन-सायलीची जोडी असो किंवा खलनायिकेची भूमिका साकारणारी प्रिया ऊर्फ तन्वी असो.

प्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर सध्या चर्चेत आहे. प्रियांकाने नुकतीच एक मुलाखत दिलीय. त्यात अभिनेत्रीने तिच्या खऱ्या आयुष्यातील क्रशबद्दल सांगितलं आहे. रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाला एका मिनिटात अनेक प्रश्न विचारण्यात आले. ‘वन मिनिट विथ सेलिब्रिटी’ या सेगमेंटमध्ये प्रियांकाने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

हेही वाचा… “ओय मखना” या गाण्यावर थिरकल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील अभिनेत्री, ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “मेकअप रूम…”

मुलाखतदाराने पहिला प्रश्न “तीन शब्द, जे तुझं वर्णन करतील?” असा विचारला असता प्रियांका म्हणाली, “साधी, गुंतागुंतीची पण सुंदर”, दुसऱ्या प्रश्नात प्रियांकाला अशा एका चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं जो ती वारंवार पाहू शकते. यावर प्रियांकाने “दिल चाहता है” असं उत्तर दिलं.

नंतर मुलाखतदाराने प्रियांकाला तिच्या बॉलीवूड क्रशबद्दल विचारलं असता प्रियांका म्हणाली, विकी कौशल. यालाच जोडून मुलाखतदाराने विचारलं, “जर विकी कौशल तुझ्या बाजूला असेल तर तू त्याला काय म्हणशील.” यावर ती म्हणाली, “मी काहीच नाही म्हणणार, मी फक्त त्याच्याकडे बघत राहीन.”

“जर त्याच्यासाठी गाणं गायची संधी मिळाली तर…” असाही प्रश्न मुलाखतदाराने विचारला. यावर प्रियांका “मी नाही गाणार कारण तो पळून जाईल, यामुळे मी तो धोका नाही पत्करू शकत, म्हणून मी नाही गाणार”, असे म्हणाली.

हेही वाचा… “तरी नवरा हाच पाहिजे”, वटपौर्णिमेच्या निमित्ताने ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला पती अविनाश यांच्यासाठी खास व्हिडिओ

या प्रश्नांमध्ये प्रियांकाला मालिका जास्त आवडते की नाटक. असंदेखील विचारलं असता प्रियांकाने नाटक हे उत्तर दिलं. प्रियांकाला ‘चीट मील’बद्दल विचारलं असता, अभिनेत्रीने “पाणी पुरी” असं उत्तर दिलं. यावर ती असंही म्हणाली की, “चांगला दिवस असो किंवा वाईट दिवस असो, मी पाणीपुरी खाते.”

हेही वाचा… ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अपर्णाने साजरी केली वटपौर्णिमा, फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान, प्रियांकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर प्रियांकाने याआधी ‘साथ दे तू मला’, ‘फुलपाखरू’ अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या प्रियांका स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारते आहे.