Tharla Tar Mag Fame Purna Aaji : ‘ठरलं तर मग’ मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ५ डिसेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. गेल्या अडीच वर्षात या मालिकेने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या शोमधले सगळेच कलाकार आता घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. याशिवाय टीआरपीच्या शर्यतीत देखील ही मालिका प्रत्येक आठवड्यात पहिल्या स्थानावर विराजमान असते. नुकताच या मालिकेने आठशे भागांचा टप्पा गाठला आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेचे ८०० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सध्या सर्व स्तरांतून या मालिकेवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. मालिकेची नायिका जुई गडकरी, मुख्य अभिनेता अमित भानुशाली, प्राजक्ता दिघे, दिशा दानडे अशा सगळ्याच कलाकारांनी या मालिकेला दिलेल्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. पण, या सगळ्यात पूर्णा आजींनी मालिकेच्या सेटवर केलेलं सेलिब्रेशन सर्वत्र चर्चेत आलं आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर साकारत आहेत. आज वयाच्या ६८ व्या वर्षी देखील पूर्णा आजी सेटवर कायम उत्साही असतात. मालिकेचे आठशे भाग पूर्ण होताच पूर्णा आजींनी आनंदी होऊन सेटवर स्क्रिप्ट वाचताना धमाल सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळालं. मोहम्मद रफी यांच्या “आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे…” या गाण्यावर पूर्णा आजीने ठेका धरला होता. याचा खास व्हिडीओ जुईने गडकरीने शेअर केला आहे.

जुई गडकरीने पूर्णा आजीच्या डान्स इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. अभिनेत्री या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “पूर्णा आजी आज आनंद व्यक्त करण्यासाठी सेटवर डान्स करतेय…कारण, ‘ठरलं तर मग’ मालिकेचे ८०० भाग पूर्ण झाले आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर सध्या मालिकेत कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळत आहे. अर्जुनने कोर्टात प्रिया विरोधात भक्कम पुरावे सादर करत दामिनी देशमुखची बोलती बंद केली आहे. आता अर्जुन या केसचा पुढील तपास कसा करणार, तो प्रियाचा खोटेपणा कसा उघड करेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.