‘ठरलं तर मग’ ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका कायमच अव्वल असते. या मालिकेतील अर्जुन-सायली, पूर्णा आजी, कल्पना, अस्मिता, प्रिया, नागराज, सुमन काकू, रविराज किल्लेकर या पात्रांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. सर्वांच्याच भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात.

मालिकेतील सगळेच कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स शेअर करताना दिसतात. अशातच काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये मालिकेतील सुमन काकू, म्हणजेच श्रद्धा केतकर-वर्तकने तिच्या एका गंभीर आजाराबद्दल खुलासा केला होता. तिला कानासंबंधित आजार असून गेली १७ वर्षे ती याचा सामना करत असल्याचे तिने सांगितले होते.

“तेव्हा प्रचंड त्रास झाला होता…”

FM KMW 29 या यूट्यूब चॅनेलला मुलाखतीत श्रद्धा म्हणाली होती, “मी ‘एक डाव भटाचा’ नाटक करत होते. ते करत असताना एक दिवस अचानक मला सर्दी झाली. तेव्हा माझ्या कानामध्ये आवाज सुरु झाले. म्हणजे, कुकरच्या शिट्टीचा जसा आवाज येतो. ती शिट्टी जितकी जोरात वाजते, तसे आवाज माझ्या कानात तेव्हा सुरु झाले होते. मला वाटलं की, हे कदाचित सर्दीमुळे होत असेल. पण तेव्हा प्रचंड त्रास झाला. त्याला टिनिटस असं म्हणतात.”

Award Banner

“…म्हणून काही काळ ब्रेक घेतला”

“त्याचा परिणाम माझ्या ऐकण्याचा क्षमतेवर झाला. तरुण होते तेव्हा ते चालून गेलं. पण नंतर मला नीट ऐकू यायचं नाही. जर कोणीतरी लांबून हाक मारली, तर ते कळायचं नाही. सीन चालू असताना तर दिग्दर्शक काही सूचना देत असतील तर ते मला ऐकूच यायचं नाही. या सगळ्यात माझा आत्मविश्वासच गेला. आपल्यामुळे दुसऱ्याची गैरसोय होते, असंच सतत वाटायचं. ‘सरस्वती’ मालिका करताना खूपच त्रास व्हायला लागला. म्हणून मग मी काही काळ ब्रेक घेतला”, असं ती म्हणाली होती.

“उपचार केले; पण उपयोग झाला नाही”

दरम्यान, श्रद्धाने या आजारावर उपाय केल्याचेसुद्धा सांगितले होते. ती म्हणाली होती, “यावर उपचार केले; पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कारण, याचं आवाज येण्यामागचं कारण वेगळं आहे. ते कानाच्या हाडांशी संबंधित आहे. आपल्या कानाची हाडे जी कंपन पावतात, ते माझ्याबाबतीत होत नाही. शिवाय त्याची सर्जरी करून किती यशस्वी होईल, याचीसुद्धा काहीच शाश्वती नव्हती. तेव्हा माझा मुलगा लहान होता आणि घरालासुद्धा वेळ देणं गरजेचे होते. म्हणून मग मी ठरवलं की, आता ब्रेक घेऊया.”

पुढे ऐकू येण्यासाठी श्रद्धाने एक कस्टमाइज मशीन बनवून घेतल्याचे सांगितले. याबद्दल श्रद्धा म्हणाली होती, “नवऱ्याने मला कानाचे मशीन वापरण्याचा सल्ला दिला. पण ते मशीन लावण्यासाठी संकोच वाटत होता. पण त्याने समजावून सांगितले की आपण डोळ्यांवर चश्मा लावतो तसेच हे मशीन लावायचे आहे. त्याने मला खूप सपोर्ट केला, मग मलासुद्धा ते पटलं आणि मी आता मशीन लावून काम करते.”