Chaitanya Sardeshpande Answer To Compromise Question By Fan : छोट्या पडद्यावरील काही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’ ही मालिका. काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील सायली-अर्जुन म्हणजेच जुई गडकरी आणि अमित भानुशाली ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. पण खरं सांगायचं, तर सायली-अर्जुन यांच्याबरोबरच मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.
सायली-अर्जुन यांच्याबरोबर मालिकेतील इतर सहकलाकारांनासुद्धा प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळतं. असाच एक लोकप्रिय कलाकार म्हणजे चैतन्य सरदेशपांडे. मालिकेत तो अर्जुनच्या मित्राची भूमिका साकारत आहे. आपल्या खास विनोदी शैलीने तो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो.
चैतन्य सोशल मीडियावरसुद्धा चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करीत असतो. तसेच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कातही राहतो. त्याने सोशल मीडियावरील प्रश्नोत्तरांच्या सेगमेंटद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता.
काही दिवसांपूर्वी चाहत्यांशी साधलेल्या संवादात त्याला एका चाहत्याने “मालिका किंवा चित्रपटात भूमिका मिळावी म्हणून कधी कॉम्प्रोमाइज केलं आहे का,” असा प्रश्न विचारला होता. त्यावर चैतन्यनं त्याच्या मजेशीर अंदाजात चाहत्याला उत्तर दिलं होतं.
अभिनेता चाहत्याला उत्तर देत म्हणाला होता, “हो! मी माझ्या स्वप्नांच्या कुशीत झोपलो आहे; तर मी मेहनत आणि कधी कधी टॅलेंटबरोबर कॉम्प्रोमाइज केलं आहे. अनेक नकारांशीसुद्धा मला कॉम्प्रोमाइज करावं लागलं आहे. या इंडस्ट्रीत अनेक गोष्टी कथात्मक पद्धतीनं सांगितल्या जातात; गॉसिप किंवा स्कँडल नाही.”
दरम्यान, चैतन्य सरदेशपांडे हा मराठी मनोरंजन विश्वातला लोकप्रिय अभिनेता आहे. ज्येष्ठ अभिनेते सुधीर सरदेशपांडे यांचा तो मुलगा आहे. चैतन्यनं आजवर काही मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याशिवाय नाटकांतूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या तो ‘ठरलं तर मग’ मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत तो सायली-अर्जुन यांना शक्य ती मदत करत असतो. त्याची ही भूमिका सर्वांचेच लक्ष वेधून घेते.

‘ठरलं तर मग’ मालिकेत नुकतंच अस्मिताला बाळ झालं आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सचिन (अस्मिताचा नवरा) तिला आणि बाळाला भेटायला येतो; पण अर्जुन त्याला घराबाहेर काढतो. इतक्यात अस्मिता सचिनची बाजू घेते आणि सायली-अर्जुनशी भांडते. माझा सचिनवर पूर्ण विश्वास आहे, असं ती सर्वांसमोर स्पष्टपणे बोलते. सचिनने अस्मिताची फसवणूक करूनही ती नवऱ्याचीच बाजू घेत आहे. यामुळे सुभेदार कुटुंबीयांनासुद्धा चांगलाच धक्का बसतो. आता अस्मिता पुढे नवऱ्याबाबत काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
