‘स्टार प्रवाह’च्या ‘ठरलं तर मग’ मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतं आहे. ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमातून सायलीला झालेली अटक, अर्जुनवर झालेला जीवघेणा हल्ला आणि आता सायलीची केस लढणार कोण? असा प्रश्न उभा ठाकला असतानाच मालिकेत नवीन, जबरदस्त ट्विस्ट येणार आहे.
स्त्रीने लढायचं ठरवलं तर दहा हत्तीचं बळ तिच्यात संचारतं. सायलीही आपल्या बाळाला रडायचं नाही तर कसं खंबीरपणे लढायचं याचे संस्कार देतेय. त्यामुळे आता अर्जुनच्या मदतीने सायलीच तिची केस लढणार आहे.
या सगळ्या नाट्यमय घडामोडींसह सायलीचा नवा लूकही सध्या चर्चेचा विषय ठरतोय. नेहमीच्या पारंपरिक लूकपेक्षा आता मॉडर्न अंदाजात सायली दिसणार असून, तिच्या या नव्या रूपाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सायलीच्या व्यक्तिमत्त्वात झालेला हा बदल केवळ तिच्या लूकपुरता मर्यादित नसून तिच्या विचारांमध्ये आणि आत्मविश्वासातही झालेला बदल यातून दिसून येतो.
सायलीची भूमिका साकारणारी जुई गडकरी देखील या नव्या लूकमुळे खूपच उत्साही आहे. बऱ्याच दिवसांनंतर मॉडर्न अंदाजात वावरायला मिळत असल्यामुळे जुईसाठीही हा लूक खास आहे. सायलीच्या व्यक्तिरेखेला मिळालेला हा नवा अंदाज आणि तिच्या व्यक्तिमत्त्वात दिसणारा आत्मविश्वास साकारताना जुईला वेगळीच मजा येत आहे.

नवा लूक, नवा आत्मविश्वास आणि स्वतःसाठी लढण्याचा नवा निर्धार… सायलीच्या या नव्या रूपाचा प्रवास ‘ठरलं तर मग’मध्ये पाहायला मिळणार आहे. आता सायली कायदेशीर लढाईत कशी बाजी मारणार? अर्जुन तिची साथ कशी देणार? आणि या सगळ्या संकटातून सायली आणि तिचं बाळ सुखरूप बाहेर पडणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच लागून राहणार आहे. कोर्टात सगळे पुरावे घेऊन सायली पोहोचते आणि माझी केस मी स्वत: लढणार असं सर्वांसमोर जाहीर करते. प्रेक्षकही हा प्रोमो पाहून खूश झाले आहेत.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष लवकरच भाग रात्री ८:३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केला जाईल.
